चिपळूण: शहरातील स्वामी मठ रस्त्यावर असलेल्या सर्व्हिस वायरला ट्रकच्या छताचा स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट झाले. त्यातून ट्रकातील कापूस व फोम शीटच्या मालाला अचानक आग लागली. या आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ट्रकातील संपुर्ण माल जळून खाक झाला. गुरूवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमक दलासह पोलिस व नागरिकांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
चिपळूण रेल्वे स्थानक नजिकच्या गोडावून मधून गादीसाठी लागणारा कापूस व फोम शीट या ट्रकातून शहरातील काविळतळी येथे आणण्यात येत होते. त्यासाठी मुरादपूर स्वामी मठ रस्त्याने हा ट्रक निघाला होता. पवनतलावाच्या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व्हिस वायरला ट्रकचा छताचा भाग चिटकला. त्यातून शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रकमधील मालाला आग लागली. क्षणातच आगीचा मोठ्या प्रमाणात भडका उडाला. ट्रकमध्ये फोम शीट व कापूस खचाखच भरलेला होता. त्यामुळे आग क्षणाक्षणाला वाढत होती. या आगीने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे अनेकांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. तसेच तत्काळ नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्याप्रमाणे अग्नीशामक बंब सोबत पाण्याचा एक टॅंकर घटनास्थळी दाखल झाला. एकाचवेळी दोन पाईप द्ववारे पाण्याचा मारा करण्यात आला. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. अखेर अर्ध्या तासानंतर ही आग नियंत्रणात आली. यावेळी काही तरूणांनी बांबूच्या सहायाने ट्रकातील माल ढकलून नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न केले. तोवर बहुतांशी माल जळून खाक झाला होता.
संबंधित ट्रक अल्ताफ इब्राहिम शेख यांच्या मालकीचा असून चालक नुराज शाह हा ट्रक घेऊन जात होता. ट्रकाला आग लागल्याने त्याने ट्रकातून उडी घेत जीव वाचवला. या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून याबाबत महावितरणकडे देखील संपर्क साधण्यात आला.