मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ‘तिकीट ट्रे’ला ‘ईटीआयएम’ मशीनचा पर्याय उपलब्ध झाल्याने खटखट थांबली. रत्नागिरी विभागात १६३५ ‘ईटीआयएम’ मशीन उपलब्ध असून ५३५ मशीन नादुरुस्त आहेत. पर्यायी मशीन उपलब्ध असल्याने वाहकांची गैरसोय होत नाही. मात्र ऐन फेरी सुरू असताना, मशीन नादुरुस्त झाले तर मात्र पर्याय म्हणून ‘तिकीट ट्रे’चा वापर करावा लागत आहे.
‘ईटीआयएम’ मशीनमुळे तिकीट काढणे, हिशेब ठेवण्याचे वाहकांचे काम सुलभ झाले आहे. मशीन बंद पडले तर मात्र नाइलाजाने तिकीट ट्रे वापरावा लागत आहे. कोरोनामुळे सध्या फेऱ्यांची संख्या घटली असून एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. फेऱ्या कमी असल्याने मशीनचा वापरही सध्या कमीच होत आहे.
पर्यायी मशीन उपलब्ध
अनलाॅकमध्ये एस.टी.च्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असल्याने तरी संख्या मर्यादित आहे. लांब पल्याच्या गाड्या बंद आहेत. त्यामुळे तिकीट ट्रेचा वापर सहसा करावा लागत नाही. पर्यायी ‘ईटीआयएम’ मशीन्स उपलब्ध आहेत.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
आकड्यांची जुळवाजुळव करावी लागते
सध्या पूर्ण क्षमतेने विभागातील एस.टी. वाहतूक सुरू नाही. त्यामुळे ‘ईटीआयएम’ मशीनची उपलब्धता होत आहे. फेरी सुरू असताना अचानक मशीनमध्ये बिघाड झाला तर मात्र तिकीट ट्रे हातात घ्यावा लागतो. ‘ईटीआयएम’ मशीनमुळे हिशेब सोपा झाला आहे. तिकीट ट्रेमुळे आकड्यांची जुळवाजुळव करावी लागते. स्टेजनुसार सर्व हिशेब लिहून ठेवावा लागत असल्याने तो किचकट वाटतो.
n लाॅकडाऊनपूर्वी साडेचार हजार फेऱ्या सुरू असताना सध्या अवघ्या १३०० फेऱ्या सुरू आहेत.
n दिवसाला ५० लाख उत्पन्न अपेक्षित असताना २० ते २२ लाखांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.
पगार मिळतोय हेच नशीब
दरमहा सात तारखेला होणारे वेतन गेल्या दोन महिन्यांत उशिरा होत आहे. वेतन दहा ते बारा दिवस विलंब होत असल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असली तरी कर्मचाऱ्यांना पगार होत असल्याचे समाधान आहे. कोरोना, पूरस्थितीतही चालक, वाहक सेवेला प्रथम प्राधान्य देत आहेत.