दापोली : तालुक्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला असून, कोणी लस देता का लस, अशी परिस्थिती दापोली तालुक्यात सुरू आहे. एकीकडे लसीचा तुटवडा जाणवत असताना त्याचे नियाेजन न करता ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानाचा फार्स कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस नाही, दुसऱ्या तालुक्यात लस घेण्यासाठी जावे लागत आहे. जिल्ह्यातील आणि तालुक्यात लस उपलब्ध नसल्याने पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचा कालावधीही संपत आला आहे. त्यांना अजूनही लस मिळालेली नाही. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने त्यांंना वाऱ्यावर सोडून दिले आहे. एकीकडे लसीचा तुटवडा नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग तालुक्यात लस का उपलब्ध हाेत नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील नागरिकांचे स्वॅब घेतल्यानंतर त्याचे अहवालही उशिराने मिळत आहेत. त्यामुळे नागरिक पाॅझिटिव्ह आहे की नाही याची माहिती वेळेत मिळत नाही. अहवाल हाती मिळेपर्यंत वेळ जात असल्याने एखादा नागरिक पाॅझिटिव्ह आल्यास ताे सर्वत्र फिरून आलेला असताे, याला जबाबदार काेण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकीकडे प्रशासनाने नागरिकांना वाऱ्यावर साेडले असून, दुसरीकडे आराेग्याची काळजी दाखवत अभियान राबवण्यात येत आहे.