देवरूख : शहरातील जिल्हा परिषद केंद्र्रशाळा नं. २ शाळेतील साहित्य ठेवलेल्या खोलीत शॉर्टसर्कीटमुळे बुधवारी अचानक आग लागली. आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. विद्यार्थी जवळपास नसल्याने अनर्थ टळला आहे. अचानक खोलीतून धुर आल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले. शिक्षक, नागरिक, लोकप्रतिनिधींच्या मदतीने आग विझविण्यात यश आले.सोळजाई मंदिरापुढील बाजूस केंद्रशाळा नं. २ आहे. बुधवारी शाळेच्या परिसरात केंद्राच्या हिवाळी क्र ीडा स्पर्धा सुरू होत्या. केंद्रशाळेतील एका खोलीत कुंभ्याचा दंड, मोगरवणे या बंद झालेल्या शाळांचे सामान ठेवण्यात आले होते.
याच खोलीत बुधवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. खोलीत धुर येत असल्याचे शिक्षक, खेळाडूंच्या निदर्शनास आले. पाहणी केली असता, आग लागल्याचे निदर्शनास आले.आग विझविण्यासाठी उपस्थितांची एकच धावपळ उडाली. शाळा परिसरात असलेले पाणी आगीवर मारण्यात आले. देवरूख नगरपंचायतीच्या मार्फत टँकर घटनास्थळी पाठविण्यात आला होता. यामुळे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आगीमध्ये ६ फूट उंचीचे पत्राचे शोकेस कपाट, शिलाई मशिन, क्रीडा साहित्य ड्रम सेट, पाण्याची टाकी, वजन काटा, गणित पेटी, विज्ञान पेटी, ४ फूटी कपाट, वॉटर कुरिफायर १, टेलिव्हीजन सेट १, ५०० पुस्तके, घड्याळ जळून खाक झाले आहे. याबाबतची पंचयादी घालण्यात आली.यावेळी उपसभापती अजित गवाणकर, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगरसेवक वैभव कदम, बंड्या बोरूकर, तुषार थरवळ, श्रीयांका गुरव, प्रतिभा कदम, शशिकांत त्रिभुवणे आदी उपस्थित होेते.