रत्नागिरी : पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्यांमध्ये पाैष्टिक गुणधर्म असल्याने अस्सल गावच्या पध्दतीने शिजवून खवय्यांना चव चाखता यावी यासाठी रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथे श्रावण स्पेशल उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्टुली, भारंगी, कुरूडू, पानाचा ओवा, टाकळा, आंबेडा, कुड्याच्या शेंगा, फोडशी या प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. खवय्यांना हळदीच्या पानातील पातोळे, अळुवडी देण्यात आली.
ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे ग्रामपंचायतीतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मावळंगे आंबेट ग्रामपंचायतीतर्फे पंचायत समितीचे सदस्य सुभाष नलावडे यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष डावल, अनिल मोरे, सरपंच प्रकाश वीर, उपसरपंच वसंत मांडरकर उपस्थित होते.
मोफत चष्म्याचे वाटप
आरवली : धामापूरतर्फे संगमेश्वर येथील सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ४० रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. काेरोना काळात सर्वत्र भीतीचे वातावरण असल्याने शहराच्या ठिकाणी जाऊन डोळे तपासणी करता येत नसल्याने ग्रामस्थांना या शिबिराचा लाभ घेता आला.
शेतीशाळा वर्ग
गुहागर : तालुक्यातील खामशेत येथे शेतीशाळा वर्ग क्रमांक ६ आयोजित करण्यात आला होता. भातपिकावरील प्रमुख कीड व रोगाविषयी प्रत्यक्ष भातपीक क्षेत्रावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. भात, हळद, कुळीथ, चवळी, भाजीपाला झेंडू, काजू पिकाविषयी माहिती देण्यात आली.
रेटिना महाशिबिर आजपासून
रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हाॅस्पिटलला एक वर्ष पूर्ण होत असल्याने दि. २६ ते २९ ऑगस्ट अखेर रेटीना महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. मधुमेही व्यक्तीच्या डोळ्याच्या पडद्याची तपासणी महाशिबिरात केली जाणार आहे. रेटीना तज्ज्ञ डाॅ. प्रसाद कामत रुग्णांची तपासणी करणार आहेत.