रत्नागिरी : आता ढोल पथकाची मक्तेदारी मुंबई, पुण्याची न राहता रत्नागिरीतही महिलांनी याची सुरूवात केली आहे. जयगड येथे जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या सहकार्याने या ढोल पथकाची सुरूवात गणेशाच्या आगमनावेळी करण्यात आली. या पथकाचे वैशिष्ट्य हे की, ढोल वादन हे पारंपरिक वेशभूषेमध्ये केले जाते. तसेच या पथकामध्ये १८ ते ६७ वर्षे वयोगटातील महिला आहेत.
या महिला ढोलपथकासाठी श्रुती मेस्त्री यांनी पुढाकार घेत परिसरातील महिलांना एकत्र केले. त्यांना नेत्रा पवार, अंकिता मयेकर, गायत्री रहाटे आणि शिल्पा मेस्त्री यांनी उत्तम साथ दिली. दोन महिन्यांच्या तयारीनंतर हे पथक सज्ज आहे. ओम मोरे आणि साई राज सुर्वे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. परिसरातून ढोल पथकाचे काैतुक हाेत आहे.
जेएसडब्ल्यूच्या जयविनायक रंगमंचावर या पथकाचा उद्घाटन समारंभ झाला. यावेळी आकांक्षा ग्रुपच्या राजेश्वरी पेदान्ना आणि ममता दवे यांच्या हस्ते ढोल पथकाचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोर्ट युनिट हेड करुण दवे, एनर्जी युनिट हेड पेदान्ना आणि सी. एस्. आर विभाग प्रमुख अनिल दधीच उपस्थित होते.