देवरुख : दहाव्या वर्षी विजेचा शॉक लागून एक पाय मांडीपासून कायमचा काढला गेला. पुढे संपूर्ण आयुष्य अपंगत्वाचे जगणे नशिबी आले. मात्र, अशाही परिस्थितीत संकटाशी दोन हात करत लढत राहायचं, असा निश्चय करत आयुष्याला सामोरे गेलेले संगमेश्वर तालुक्यातील तुरळ (हरेकरवाडी) येथील श्रीपत जवरत (६५) हे झाडावरून पडल्याने जखमी झाले आहेत. मात्र, हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावरील उपचारासाठी मदतीची गरज आहे.
लहानपणी अपघाताने आलेल्या अपंगत्वावर मात करत आपल्या कामातून अनेकांना प्रेरणा देणाऱ्या श्रीपत जवरत यांची घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. ना शेत ना हक्काचं घर, अपंगत्वामुळं लग्न झालं नाही. त्यामुळे आधारासाठी हक्काचं कुणीही नाही. पोट भरण्यासाठी कोणी सांगेल त्याठिकाणी जायचं आणि उंच झाडावरील नारळ काढून देणे आणि देतील ती रक्कम घेणे, असे काम सुरू हाेते. तसेच झाडाची स्वच्छता करणे व आंबे काढून देणे हाच एकमेव उदरनिर्वासाठीचा व्यवसाय होता. एक पाय नसला तरीही जिद्दीच्या जोरावर त्यांना तालुक्यातील अनेक गावांत खास नारळ काढण्यासाठी निमंत्रित केले जात होते.
मात्र, एका झाडावरून पडल्याने त्यांच्या दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. सध्या संगमेश्वर आरोग्य केंद्रामध्ये ते प्राथमिक उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यासाठी माेठा खर्च येणार आहे. एवढी मोठी आर्थिक तरतूद नसल्याने हा खर्च कसा करायचा, हा प्रश्न आहे.
वयाच्या ६५ व्या वर्षी एका पायाने झाडावर चढून लोकांना नारळ काढून देणाऱ्या श्रीपत जवरत यांच्यावर आलेल्या प्रसंगातून त्यांना सोडविण्यासाठी समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन वाडीप्रमुख व माजी सभापती कृष्णा हरेकर यांनी केले आहे.