चिपळूण : संविधानिक मूल्यांवर आधारित व्यवस्था परिवर्तन हे श्रीराम दुर्गे यांच्या साहित्याचे वेगळेपण होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व साहित्यामध्ये उमटलेली दिसतात. मानवी जीवन हे मूल्याधारित असावे, अशी धारणा घेऊन श्रीराम दुर्गे सातत्याने साहित्य क्षेत्रात कार्यरत होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे साहित्य अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
येथील साहित्यिक श्रीराम दुर्गे यांचे आकस्मिक निधन झाले. येथील मित्र परिवारातर्फे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ऑनलाइन शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उपस्थित होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पुढे म्हणाले की, श्रीराम दुर्गे यांनी कथा, कविता, कादंबरी या विविध माध्यमांतून सामान्य माणसाला नायकत्व प्रदान केले. त्यांच्या जगण्याचे प्रश्न समाजासमोर मांडले. सामाजिक बांधिलकी आणि चिंतनशील स्वभाव या माध्यमातून एक आदर्श शिक्षक ते संवेदनशील साहित्यिक असा त्यांचा प्रवास झालेला होता. समाजातील सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता, सांस्कृतिक विषमताही दूर झाली पाहिजे, अशा प्रकारची धारणा श्रीराम दुर्गे यांनी अखेरपर्यंत जपली.
सभेत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. डॉ. बाळासाहेब लबडे, डॉ. संजय पाटोळे, प्रा. युवराज धसवाडीकर, शिवा कांबळे, डॉ. भगवान वाघमारे, नरसिंग घोडके, भीमराव रायभोळे, सुरेश पाटोळे, डॉ. सोमनाथ कदम, चंद्रकांत राठोड या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रीराम दुर्गे यांच्या साहित्य व व्यक्तिमत्त्वाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेचे आयोजन आणि सूत्रसंचालन इंडियन स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांनी केले. बुक्टूचे अध्यक्ष प्रा. डॉ. गुलाब राजे यांनी प्रास्ताविक केले़ आभार प्रदीप दुर्गे यांनी मानले़