रत्नागिरी : कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक ठरत आहे. त्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे गेले दोन दिवस कडक लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनला लोकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे शहर परिसरात सर्वत्र शुकशुकाट आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजुरी
दापोली : रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ क वर्ग पर्यटन स्थळ विकासकामांतर्गत मुरूड येथील प्रस्तावित कामांना निधीसह मंजुरी देण्यात आली. मौजे मुरूड मारुती मंदिर ते मनोज बांदल यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, बोवणेवाडी ग्रॅव्हिटी नळपाणी योजनेसाठी साठवण टाकी बांधणे, गटाराच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुबीन जुवळे यांचा सत्कार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई मुस्लिम मोहल्याचे सुपुत्र व मुंबईतील इंटेलिजन्सी झोनल युनिटमध्ये वरिष्ठ अधिकारी असलेले मुबीन कादीर जुवळे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इंटेलिजन्सी ऑफिसर डायरेक्टर जनरल ऑफ रिव्हेन्स इंटेलिजन्स झोनल युनिटमध्ये १९९२ पासून ते कार्यरत होते.
टॉवर सुरू करण्याची मागणी
दापोली : तालुक्यातील उन्हवरे, दाभिळ, पांगारी व दुर्गम परिसरातील भारत संचार निगमची सेवा ठप्प आहे. त्यामुळे परिसरातील मोबाइलधारक हैराण झाले आहेत. सध्या ऑनलाइन कामकाज सुरू असून, महावितरणचे वीज बिल न भरल्यामुळे दाभिळ, पांगारी येथील टॉवरचा वीज पुरवठा खंडित केला आहे.
समाजभूषण पुरस्कार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ मापारी मोहल्ला येथील जमातुल मुस्लिमीन जमातीचे सचिव बशीरभाई अल्लीखान यांना विश्व समता भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या बशीरभाई यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाची मागणी
दापोली : तालुक्यातील कुटाचा कोंड ते टेटवली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संबंधित रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. डांबरीकरण उखडले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी होत आहे.