राजापूर :
शासनाने जाहीर केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनला सलग दुसऱ्या दिवशीही राजापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला हाेता. तालुक्यातील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही दुकाने बंद ठेवली होती. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल व दवाखाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद असल्याने राजापूर बाजारपेठेत नीरव शांतता पाहायला मिळाली.
पाेलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. राजापूर, जवाहर चौक येथे विनाकारण दुचाकी व इतर वाहनांमधून फिरणाऱ्या नागरिकांची पूर्ण चौकशी करण्यात येत हाेती. विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासूनच पोलीस प्रशासनाने राजापूर शहरात स्पीकरवरून नागरिकांना हा लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या लॉकडाऊनमधून वगळण्यात आली असली, तरी सर्वत्र अतिशय तुरळक प्रमाणात वाहतूक दिसत हाेती. एस.टी. महामंडळाच्या लोकलफेऱ्याही रविवारी बंद होत्या. तर, शहरातील रिक्षांचीही संख्या तुरळक प्रमाणात होती. त्यामुळे नागरिकांनी रविवारी दिवसभर घरातच राहणे पसंत केले हाेते.