रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन १५ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी वेळेची मर्यादा शासनाने घातली आहे. अन्य व्यवसायासाठी मात्र बंदी आहे. असे असतानाही शहरातील व्यापारीपेठ असलेल्या रामआळीत शटर खाली ओढून आतमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. एकीकडे कोरोना हद्दपारीसाठी कडक निर्बंध लावले जात असताना, दुसरीकडे मात्र व्यवसायासाठी कोरोना संसर्ग वाढविण्यात येत आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. काही मुहूर्त आठ-पंधरा दिवसांवर आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी लग्नासाठी लागणारे कपडे, भांडी अन्य साहित्यासह दागिने खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही सुवर्णकार ग्राहकांना घरी बोलावत आहेत. सुवर्णकाराच्या घरी व्यवहार करण्यात येत आहेत. मात्र कपडे, चप्पल, अन्य वस्तूंसाठी व्यापारी दुकाने उघडत आहेत. दुकानाबाहेर दुकानदाराचा माणूस बसत आहे. चार चार ग्राहक आत सोडून शटर लावले जात आहे. आतल्या ग्राहकांची खरेदी पूर्ण झाली की, बाहेरचा अंदाज घेत ग्राहकांना बाहेर सोडले जाते व पुन्हा अन्य चार ग्राहकांना आत घेण्यात येते.
लग्नसराईमुळे लाखोंची खरेदी सुरू असल्यामुळे व्यापारी ग्राहक सोडत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना वेळ देऊन बोलाविण्यात येत आहे. ग्राहकांचीही खरेदी होत असून व्यापाऱ्यांचाही व्यवसाय होत आहे. मात्र यामुळे कोरोनाचे निर्बंध धाब्यावर बसविण्यात येत आहेत.
शासकीय अधिकाऱ्यांकडून भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत असून, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. लाॅकडाऊनमुळे निर्बंध कडक करण्यात आले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज आहे. नाक्यानाक्यांवर पोलीस गस्त देत आहेत. असे असताना व्यापारीपेठेतील कपडे, चप्पल अन्य तत्सम् वस्तूंचे सुरू असणारे व्यवहार कोणाच्या आशीवार्दाने सुरू आहेत, असा प्रश्न जनमानसातून व्यक्त होत आहे. शिवाय शहरात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रवेश कसा देण्यात येतो, असाही सवाल केला जात आहे.