लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. काही व्यापारी शटर आड व्यापार करत असल्याने येथील पोलीस यंत्रणा व नगरपरिषद प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हेही दाखल केले आहेत.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू घरपोच सेवा पद्धतीने विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दुकाने उघडल्यास कारवाई केली जात आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनीही त्याला सहकार्य केले आहे. गेले २० दिवस सलग येथील बाजारपेठ बंद आहे. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत गर्दी झाल्याने कडक निर्बंध लागू केले आहेत तरीही काही दुकानदार शटर बंद ठेवून आतमध्ये ग्राहकांना दुकानाच्या मागील बाजूने घेतले जाते. त्यामुळे शटरआड सुरू असलेल्या या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी चार व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करत कारवाई केली होती. त्यानंतरही हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे नगरपरिषदच्या मदतीने अशा व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर थेट गुन्ह दाखल केला जात आहे. यामध्ये गांधी चौक येथील वर्धमान साडी सेंटरचे अजित जैन, जैन सन्स क्रिएशनचे महेंद्र बन्सीलाल जैन, सुराणा गारमेंटचे वसंत जयंतीलाल सुराणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली.