देवरुख : पोहायला गेलेला भाऊ बुडतोय, असे दिसताच त्याने क्षणाचाही विलंब केला नाही आणि नदीच्या दिशेने झेप घेतली. पोहण्यात तरबेज असल्याने त्याने चुलतभावाला वाचवले. याचवेळी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पट्टीचा पोहणारा असलेल्या सिद्धेशला मात्र जगाचा निरोप घ्यावा लागला.
कुटुंबात एकुलता एक असलेल्या सिद्धेश झगडे याला सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने नुकतीच परीक्षादेखील दिली होती. मात्र, सैन्यात जाण्याची आणि कुटुंबाचा आधार बनू पाहण्याची त्याची ही इच्छा अधुरीच राहिली आहे.संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या हृतिक चंद्र्रकांत झगडे याला वाचवताना सिद्धेश रवींद्र झगडे (२०) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पट्टीचा पोहणाऱ्या सिद्धेशला सैन्यात जाण्याची इच्छा होती. गेल्याच महिन्यात त्याने सैन्यात जाण्यासाठी प्रवेश परीक्षाही दिली होती. पण काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सिद्धेशचे हे स्वप्न अपूर्णच राहिले.सिद्धेशच्या निधनामुळे कळंबुशी गावावर शोककळा पसरली आहे. सिद्धेश हा रविवारी दुपारी मित्राला वाचवताना बुडाला होता. त्यानंतर तब्बल २० तासाने त्याचा मृतदेह सापडला. सिद्धेश व हृतिक हे एकाच कुटुंबातील असून, रविवारी ते दोघे व इतर दोघे जनावरे चारायला खाचारआगार येथील पाणलोट बंधाऱ्यांवर गेले होते.
दोन दिवसांपासून कळंबुशी-माखजन भागात जोरदार पाऊस पडत असल्याने गावनदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. रविवारी सुटी असल्याने हृतिकला पोहण्याचा मोह झाला व त्याने सिद्धेश व इतर दोघांनाही पोहायला जाऊया, असे सांगितले. पण त्यांनी नकार दिला. यामुळे हृतिक हा एकटाच पोहायला गेला.
यावेळी त्याने बंधाऱ्यांजवळील डोहात उडी मारली. पण डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. हृतिक बुडत असल्याचे लक्षात आल्याने त्याला वाचवण्यासाठी सिद्धेशने पाण्यात उडी मारली. सिद्धेश हा पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने कसेबसे हृतिकला वाचवले. पण याचदरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने व डोह खोल असल्याने सिद्धेश मात्र पाण्यात बुडाला.सिद्धेश बुडाल्याचे बघताच मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली व झालेल्या घटनेबद्दल सिद्धेशच्या कुटुंबियांना सांगितले. काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व शोधकार्य सुरू केले. यावेळी परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले.