‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेमुळे सर्वच राजकीय पक्षात पसरला सन्नाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:43 PM2022-07-30T17:43:46+5:302022-07-30T17:45:00+5:30
मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, तोपर्यंत कुंपणावरच्या लोकांना तळ्यात की मळ्यात हा निर्णय घेता येणार नाही.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : गेल्या महिनाभरात घडलेल्या राजकीय घडामोडी, त्यानंतर सुरू असलेले आराेप - प्रत्यारोप, युती आणि महाविकास आघाडीबाबतचे साशंकतेचे वातावरण या साऱ्यामुळे सध्या सर्व राजकीय पक्षांमध्ये सन्नाटा पसरला आहे. वातावरण शांत दिसत असले तरी सर्च पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये खूप अस्थिरता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी स्वतंत्र भूमिका घेत शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी सत्ताही स्थापन केली. मात्र, त्यांचे हे बंड अधिकृत की अनधिकृत, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांचा, की एकनाथ शिंदे यांचा, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना धनुष्यबाण निशाणी मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरीत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा लवकर निकाल लागेल आणि कसलाही तिढा निर्माण होणार नाही, अशी अटकळ कदाचित बांधली जात होती. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी स्वतंत्र घटनापीठाकडे सोपवल्याने आता केवळ प्रतीक्षा करणेच राजकीय लोकांच्या हाती राहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाची स्थापना होईल आणि त्यानंतर खूप काही बदल होतील, असे अपेक्षित आहे. मात्र, त्याबाबतची सुनावणी अजून पूर्ण झाली नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, तोपर्यंत कुंपणावरच्या लोकांना तळ्यात की मळ्यात हा निर्णय घेता येणार नाही. म्हणूनच अशा लोकांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते विभागले गेले आहेत. आणखीही मोठे बदल अपेक्षित धरले जात आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा केली जात आहे.
रत्नागिरी आणि दापोलीत अनेक मोठे बदल होणार आहेत. त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्याची चुणूक दिसेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
शिवसेना
अजूनही अनेकजण शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार, गटाचे चिन्ह, विलीनीकरण होणार का, अशा गोष्टींचा तिढा सुटला की काठावरचे अनेक लोक झटपट शिंदे गटात सहभागी होतील. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. जाणाऱ्यांची संख्या अधिक झाली तर आपले राजकीय भवितव्य धोक्यात येईल, अशीही चिंता अनेकांना आहे.
राष्ट्रवादी
आता राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस नाही. लोकांची कामे केल्याशिवाय लोकांकडे पुन्हा मतांसाठी जाता येणार नाही. सत्ता शिवसेनेच्या एका गटाकडे असल्याने आणि त्यांना वाढीची मोठी संधी असल्याने महाविकास आघाडी सरकारच्या राजकारणात पुढे येत असलेली राष्ट्रवादी पुन्हा मागे जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीतही अस्थिरता आहे.
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस अतिशय क्षीण झाली आहे. कुठलीही निवडणूक राष्ट्रवादीच्या आधाराशिवाय लढवणे काँग्रेसला शक्य नाही. शिवसेनाही सोबत असेल तर काँग्रेसला काही जागा तरी पटकावता येतील. मात्र, महाविकास आघाडी होण्याबाबत अजून कोणतेही संकेत नाहीत. त्याबाबत साशंकताच असल्याने काँग्रेसमध्येही अस्थिरता आहे.
भाजप
इतर पक्षातील लोक सामावून घेण्याबाबत भाजपमध्ये काहीशी उदासीनताच आहे. त्यातच शिवसेनेपासून वेगळा झालेला गट आपल्या पक्षात येणार का, पुढच्या सगळ्याच निवडणुका या गटासोबत युतीने लढवल्या जाणार का, त्यात आपल्या लोकांना कितीशी संधी मिळणार, अशा अनेक प्रश्नांमुळे भाजपच्या गोटातही काहीही अस्वस्थता पसरली आहे