कणकवली : पाच लाख बक्षिसाची हाव नांदगावातील प्रदीप सावंत (३२) यांना नडली. पोलीस यंत्रणा विविध प्रकारची जनजागृती करीत असतानाही सुशिक्षित तरुण ठकसेनांच्या जाळ्यात सापडत असल्यामुळे पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे. या पिढीला कसे आवरावे या विचारात पोलीस खाते पडले आहे. जनजागृती करूनही कोणीही लक्ष देत नसल्याबद्दल पोलीसच बुचकळयात सापडले आहेत.नांदगाव येथील प्रदीप सावंत हे गोव्यात औषध कंपनीत कामाला आहेत. ते सुटीवर गावी आले असता त्यांना २७ जुलैला त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. आपण ५ लाख जिंकलात. या चार शब्दांनी प्रदीप सावंत यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
बक्षीस मिळणारच असा विश्वास सावंत यांना वाटल्यामुळे ठकसेन सांगेल त्या प्रमाणे सावंत पैसे भरत राहिले. ठकसेनाने ई मेल व नाव पाठवायला सांगितले. सावंत यांनी ई मेल व नाव ठकसेनाला पाठवून दिले. आपण ड्रॉ जिंकलात असा फोन ठकसेनाने केला. कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी २५ हजार रुपये भरा, असे ठकसेनाने सांगताच सावंत यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी थेट बँक गाठून ठकसेनाच्या बँक खात्यात ४ आॅगस्टला २५ हजार रुपये भरले.
ठकसेनाचा प्रदीप सावंत यांना पुन्हा फोन आला. बक्षिसाची रक्कम मोठी आहे. त्यामुळे सीओटी व पासवर्ड बनवण्यासाठी ९८ हजार ९९९ भरण्यास ठकसेनाने सांगितले. सावंत यांनी तेही पैसे भरले. ७ आॅगस्टला ठकसेनाचा पुन्हा फोन आला. आयटी कोडसाठी १ लाख ३० हजार रुपये भरण्यास प्रदीप सावंत यांना सांगण्यात आले. सावंत यांनी तेही पैसे भरले. प्रदीप सावंत आपल्या जाळ्यात पूर्णपणे फसला गेला हे ठकसेनाने हेरले व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी आणखी ५० हजार रुपये पाठवण्यास सांगितले.२७ जुलैपासून हे फसवणूकनाट्य सुरू होते. अखेरीस आॅगस्ट क्रांती दिनी ५ लाखांचे बक्षीस नाहीच, पण २ लाख ५४ हजाराला आपण फसल्याची जाणीव झाली. त्यांनी थेट कणकवली पोलीस ठाणे गाठले. फसवणूक झाल्याची कैफियत मांडली. पोलिसांनी भिंतीवर लटकवलेले बोर्ड दाखवले.
कुणाचा फोन आल्यास व फसवणूक होत असल्याचे वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करूनही सावंत यांनी कसलीच शहानिशा न करता २ लाख ५४ हजार भरून ठकसेनाची चांगलीच कमाई करून दिली आहे. ठकसेनाने १२ दिवसांत तब्बल २ लाख ५४ हजारांची कमाई केली.