लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : उन्हाळ्याच्या झळा वाढत असतानाच ग्रामीण भागात टंचाईची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील सर्वाधिक पाणीटंचाईची झळ दसपटी विभागाला बसली आहे. तिवरे धरणफुटीमुळे नदीत पाणी नसल्याने महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. तालुक्यातील केवळ एकाच टँकरद्वारे १६ गावांतील २४ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर उपलब्ध करताना प्रशासनाची कसरत सुरू आहे.
तालुक्यात कोट्यवधीच्या पाणीयोजना राबविल्या तरी पाणीटंचाई नित्याचीच ठरलेली आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून नव्या पाणी योजनांना मंजुरी मिळालेली नाही. केवळ तीन-चार गावांतच मोठ्या योजना मंजूर झाल्या. अनेक गावांत १५ वर्षांपूर्वीच्या योजना असल्याने त्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. परिणामी पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी फुटलेल्या तिवरे धरणामुळे दसपटीत अधिक पाणीटंचाई आहे. दसपटीतील तिवडी, रिक्टोली, कळकवणे, ओवळी, कादवड, गाणे, आकले, आदींसह कोसबी, कळबंट, नांदगाव खुर्द, नारखेरकी, आदी १६ गावांतील २४ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे; तर आणखी १९ वाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडे पाणीपुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध नाही. उपलब्ध असलेल्या एकाच टँकरच्या माध्यमातून २४ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. एकाच टँकरवर पाणीपुरवठ्याचा भार राहिल्याने महिलांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. टँकरची मागणी असलेल्या गावात टँकर सुरू होत नसल्याने तेथील पदाधिकारी पंचायत समिती, तहसील कार्यालयाकडे टँकरसाठी पाठपुरावा करीत आहेत.
--------------------
पिटलेवाडीतील महिला हंडा माेर्चा काढणार
चिपळूण शहरालगतच्या धामणवणे पिटलेवाडी येथेही भीषण पाणीटंचाई आहे. फेब्रुवारी महिन्यापासून येथील ग्रामस्थांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. टँकर सुरू न झाल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. वाडीत टँकर सुरू करावा, अन्यथा पिटलेवाडीतील महिला पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढतील, असा इशारा वाडीतून देण्यात आला आहे.