चिपळूण : तालुक्यातील तिवरे येथे झालेल्या धरणफुटी दुर्घटनेला दोन महिने पूर्ण झाले. या दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली होती. दोन महिन्यामध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते; मात्र अद्यापही या अहवालातील माहिती प्रसिद्ध न झाल्याने मृतांच्या नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे.चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. भेंदवाडी या घटनेत भेंदवाडीतील घरे, जनावरे वाहून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला होता.धरण दुर्घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून झाली होती. याची दखल घेत शासनाने या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर संबंधित समितीने घटनास्थळाची पाहणी केली होती.
दोन महिन्यात चौकशीचा अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन दिले होते. दोन महिने उलटून गेले तरी हा अहवाल गुलदस्त्यात राहिल्याने आश्चर्य आणि संशय व्यक्त केला जात आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी गेल्या दोन महिन्यात सातत्याने झाली होती. त्यामुळे जनतेला आला एसआयटीच्या अहवालाकडे लक्ष लागून राहिले आहे.