रत्नागिरी : रत्नागिरी शहराबरोबर तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुक्यात सहा शासकीय कोरोना केअर सेंटर कार्यरत असून, त्यामध्ये रुग्णांना दाखल करण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
ज्या रुग्णांची आरटीपीसीआर किंवा ॲंटिजन चाचणी सकारात्मक आली आहे, अशा साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय भवन कोरोना केअर सेंटरमध्ये गरोदर माता, महिला व लहान मुले या रुग्णांना दाखल केले जाणार आहे. बी.एड काॅलेज कोरोना केअर सेंटरमध्ये सहव्याधी रुग्ण व ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना दाखल करण्यात येणार आहे. दामले हायस्कूल कोरोना केअर सेंटरमध्ये ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे व तरुण रुग्णांना दाखल करण्यात येणार आहे. तसेच आय.टी.आय. व गोगटे काॅलेज गर्ल्स हाॅस्टेल तसेच नगर परिषद येथील कोरोना केअर सेंटरमध्ये सर्वसाधारण व इतर रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाने नियोजन केले असून, नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.