रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाद्वारे रत्नागिरीतील शासकिय तंत्रनिकेतनच्या आवारात सुरु असलेल्या कौशल्य विकास केंद्र येथे बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शहरातील काही नागरिकांनी मंगळवारी (दि.११) उघडकीस आणला. संबधीत प्रकाराची तक्रार अभाविपने स्थानिक पोलीसांकडे केली असता पोलिसांनी काॅलेज अधिष्ठाता, प्राचार्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.शासनाकडून रत्नागिरीत चालवल्या जाणार्या या कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगस प्रशिक्षणार्थी बसवून परिक्षा घेतल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेण्यार्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखविण्याचे काम सुरु आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थ्याचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी बोगस विद्यार्थ्यांना बसविण्यात येत आहे. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, जागृत नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी मंगळवारी (दि.११ रोजी) हा प्रकार उघडकीस आणला.अभाविपने स्थानिक पोलीसांकडे याबाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यांनतर शहर पोलीसांचे पथक कौशल्य विकास केंद्रात दाखल झाले होते. पोलीसांनी तेथे परिक्षेला बसलेल्या प्रशिक्षणार्थींची माहिती संकलीत करून काैशल्य विकास केंद्राचे अधिष्ठाता अमोल गोठकडे, प्राचार्य रचना व्यास, श्रीनिवास माने, श्वेता खानविलकर, फईम नाजीम शेळके, नेहा नितीन कांबळे, प्रियांका रमेश चव्हाण, व अज्ञात इसम (पत्ता माहित नाही) यांनी संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शासनाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी या केंद्रातील कर्मचारी व श्वेता खानविलकर, फईम नाजीम शेळके, नेहा नितीन कांबळे, प्रियांका रमेश चव्हाण याचा वापर करून त्या आधारे बोगस उमेदवार बसवून शासनाची फसवणूक केली. तसेच यापूर्वी घेतलेल्या परीक्षेतील फसवणुकीसाठी वापरलेले बनावट आधारकार्ड परिक्षार्थींकडून काढून घेवून त्याची विल्हेवाट लावली म्हणून आरोपी काैशल्य विकास केंद्राचे अधिष्ठाता अमोल गोठकडे, प्राचार्य रचना व्यास, श्रीनिवास माने, श्वेता खानविलकर, फईम नाजीम शेळके, नेहा नितीन कांबळे, प्रियांका रमेश चव्हाण, व अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
कौशल्य विकास केंद्रातील बनावट परीक्षार्थी प्रकरण: कॉलेज अधिष्ठाता, प्राचार्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल
By मेहरून नाकाडे | Published: June 12, 2024 5:04 PM