रत्नागिरी : स्काय वॉक, बंदरातील सुविधा, मांडवी जेटीचे सुशोभिकरण, रस्ते डांबरीकरणासह शहरातील २१ कोटींच्या कामांना निधी उपलब्ध झाला असून, लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत दिली. बंदर सुविधांसाठी २ कोटी १२ लाख ९८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. त्यातून मांडवी बंदर जेटीच्या सुशोभिकरणासाठी ४२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरालगत भूमिपूजन झालेल्या महिला रुग्णालयाच्या कामाला सुरूवात झाली असून, त्या जमिनीत १२० ठिकाणी पाया खोदाई झाली असून, १२० खड्डे खोदण्यात आले आहेत. येत्या १५ दिवसात या रुग्णलयाच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे ते म्हणाले. वसंत कन्स्ट्रक्शनकडे हे काम आहे. शहरातील माळनाका येथील स्कायवॉकच्या कामाला डिसेंबर २०१४मध्ये सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी एकच निविदा आली होती. त्यामुळे फेरनिविदा मागविण्यात आल्या असून, ती प्रक्रिया पूर्ण होऊन डिसेंबरमध्ये काम सुरू होईल. नगरोत्थानअंतर्गत ४ कोटी ४० लाखांची कामे लवकरच सुरू होतील. टिळक आळी रस्ता डांबरीकरणाचे कामही सुरू होईल. तालुक्यातील पुलांची कामे लवकरच सुरू होणार असून, जिल्हा परिषदेला ३ कोटी ६० लाख रुपये देण्यात आले आहेत, तर पूरहानीसाठी साडेचार कोटी देण्यात आल्याचे ते म्हणाले. जनसुविधेतून ६२ ठिकाणी स्मशान शेड उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी १ कोटी ६६ लाख ४० हजारांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानातच तारांगण उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, तारांगण करायचे की नाही, याचा निर्णय पालिकेनेच घ्यावा. स्वीमिंग पूल फिल्टरेशनचे काम झाले आहे. शहराचा पाण्याचा प्रश्नही सोडविला जाणार आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत स्कायवॉकचे काम लवकरच होणार
By admin | Published: November 20, 2014 10:51 PM