रत्नागिरी : जिल्ह्यात हळूहळू पावसाची पाठ फिरू लागली आहे. दिवसभरात तुरळक सरी पडत आहेत. ऊन पडू लागल्याने आता काहीअंशी उकाडाही सुरू झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १४५.५० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चिपळूण, खेड भागात त्यामुळे मदतकार्याला वेग आला आहे.
गेल्या बुधवारी रात्रीपासून दोन दिवस सलग झालेल्या अतिवृष्टीने चिपळूण, खेड, राजापूर आणि रत्नागिरीतील काही गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण केली. मात्र, शुक्रवारपासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे पूरपरिस्थिती निवळली असून, पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. या ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा चिपळूण आणि खेड या दोन तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. पावसामुळे ही दोन शहरे आणि परिसरातील गावे जलमय झाली. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने जीवितहानीही झाली.
सध्या पूरग्रस्त भागांमध्ये सामाजिक संस्था, सामाजिक - राजकीय कार्यकर्ते मदतीसाठी सरसावले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाऊस थांबल्याने आता मदतकार्याला वेग आला आहे. सध्या घरात - दुकानांमध्ये पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल उपसण्याचे काम सुरू असून, पूरग्रस्तांना जीवनावश्यक विविध वस्तूंचे वाटप सुरू आहे.
गेल्या दोन - तीन दिवसांपासून हळूहळू पाऊस कमी होत असून, कडाक्याचे ऊन पडत आहे. अधूनमधून तुरळक सर येत आहे. पाऊस थांबल्याने आता हळूहळू उकाडाही वाढू लागला आहे.