चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूणवासीयांनी मोठा लढा दिल्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सोमवारपासून दिवसा आणि रात्री दोन्ही सत्रांत नदीतील गाळ काढला जाणार आहे. वाशिष्ठी नदीतील ७ लाख ८५ हजार, तर शिव नदीतील ४ लाख क्युबिक मीटर गाळ काढणार आहोत. गाळ काढल्यानंतर पूररेषेचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. चिपळूणवासीयांना महाविकास आघाडी सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत दिले.
वाशिष्टी व शिव नदीत सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पाहणी केली. त्यानंतर प्रांत कार्यालयात संबंधित जलसंपदा विभागाकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, महापुरानंतर चिपळूणवासीयांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्याचा परिपाक म्हणून राज्यात सर्वाधिक मोठे गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
महिना अखेर वाशिष्ठी नदीतील ७ लाख ८५ हजार, तर शिव नदीतील ३.७५ लाख क्यूबिक मीटर गाळ काढणार आहोत. मेपर्यंत हे काम सुरूच राहील. कामाची गती वाढावी यासाठी दिवस आणि रात्र दोन्ही वेळेत हे काम केले जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. नाम फाउंडेशनने शिव नदीसाठी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यांचे आणखी दोन पोकलेन वाशिष्ठी नदीसाठी मिळणार आहेत. शासनाने याकामी दहा कोटींचा निधी केवळ डिझेलसाठी दिला आहे. त्यामुळे डिझेल या खर्चासाठी निधीची कमतरता भासणार नाही. सरकारने ३२०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातील विविध कामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले.
गाळ काढण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करायला हवे. तसेच काढलेला गाळ हा सर्व शासकीय जागा, म्हाडाची जागा, खुली मैदाने, नगर परिषदेची प्रस्तावित रस्ते येथे टाकण्यात येईल. नदीमध्ये जिथे अतिक्रमण असतील ती काढण्याची सूचना सामंत यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलीस उपअधीक्षक सचिन भारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख उमेश सपकाळ उपस्थित होते.