लांजा : शेतामध्ये भाताची पेंढी बांधत असताना सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने भांबेड कोलेवाडीतील संजय दत्ताराम लांबोरे (३८) यांना जीव गमवावा लागला. लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्या बांधत असताना दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता संजय लांबोरे यांना सर्पदंश झाला. त्यांना तातडीने प्रथम भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे, त्यानंतर लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी सर्पदंशावर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाहीत.
अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने सापाचे विष त्यांच्या शरीरामध्ये पसरत होते. तीन तासानंतर रुग्णवाहिका मिळाल्यावर त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलवण्यात आले. मात्र उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले.दोन वर्षापूर्वी सर्पमित्र सुजित कांबळे यांना संर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आंदोलन उभे केले होते. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची मागणी त्यावेळी केली होती. मात्र, लोकप्रतिनिधी व सरकारी अनास्थेमुळे संजय हा सर्पदंशाचा दुसरा बळी ठरला आहे. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरवण्यात खूप वेळ गेल्याने या तरुणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप त्याचे नातेवाईक मनोहर लांबोरे यांनी केला आहे.
संजय यांना दोन लहान मुले आहेत. घरात दुसरे मोठे कोणीही कमावते नाही. आमदार राजन साळवी यांनी बुधवारी या कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वन केले. संजय यांच्यावर वेळेत उपचार न करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.