चिपळूण : आतापर्यंत तालुक्यातील २७ हजार ३५८ लोकांनी विविध लसीकरण केंद्रावरून लस घेतली आहे. शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तीन लसीकरण केंद्र कार्यरत आहेत.
तालुक्यात सुरुवातीला फ्रंट लाईन वर्कर्सना कोविड लस देण्यात आली. या कोरोना योद्धांसह सध्या ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक तसेच १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती यांचे लसीकरण केले जात आहे. शहरामध्ये एल टाईप शॉपिंग सेंटर येथे दोन केंद्र तर नव्याने पोलीस हॉल येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये याकरिता ९ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवरही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण सध्या बंद आहे.
आतापर्यंत तालुक्यात २७ हजार ३५८ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ७ हजार ५०० लोकांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस तर १ हजार १२३ लोकांनी दुसरा डोस घेतला. १९ हजार ८५८ जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस तर ६ हजार ४४६ लोकांनी दुसरा डोस घेतला. नुकतेच १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले असून, आतापर्यंत २ हजार ३९० जणांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये १,२०९ जणांनी कोवॅक्सिन तर १,१८१ लोकांनी कोविशिल्ड लस घेतली.