चिपळूण : गेली अनेक वर्षे कबड्डी क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या जिल्ह्यात एकदा तरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा व्हावी, हे सर्व कबड्डीप्रेमींचे स्वप्न आहे. ही संधी महाराष्ट्राला मिळणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ही स्पर्धा घ्यावी, याविषयीच्या चर्चेसाठी पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांची आपण भेट घेतली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच असून, पक्षाशी गद्दारी ही आमच्या रक्तात नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी येथे मंगळवारी स्पष्ट केली.गेल्या दोन दिवसापांसून पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांची जिल्हाप्रमुख कदम यांच्या भेटीविषयीशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यानंतर जिल्हाप्रमुख सचिन कदम हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.सचिन कदम यांनी सांगितले की, चिपळूण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, त्याची मुहूर्तमेढ शहरातील वडनाका येथे लावली गेली. आम्ही शिवसेनेपासून कधीही अलिप्त होऊ शकत नाहीत. पालकमंत्री तसेच किरण सामंत यांची भेट घेण्यामागे राजकीय हेतू नव्हता. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात कदापि झालेली नाही. रत्नागिरी जिल्ह्याला एकदा तरी संधी मिळायला हवी, या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत.जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने सामंत यांची भेट घेतली. लवकरच कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. खेळात राजकारणाची भिंत नसावी. हा विचार आपण कायम जपला असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, शहरप्रमुख शशिकांत मोदी, राकेश शिंदे उपस्थित होते.
..म्हणून मंत्री सामंतांची भेट घेतली; गद्दारी आमच्या रक्तात नाही, सचिन कदमांनी स्पष्ट केली भूमिका
By संदीप बांद्रे | Published: October 03, 2023 5:04 PM