प्रत्येक फेरीनंतर बसचे केले जाते निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचाही वापर
मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अनलाॅकनंतर राज्य परिवहन महामंडळातर्फे आंतरजिल्हा वाहतुकीसह ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू आहेत, शिवाय कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. दुपारी १२ वाजता रत्नागिरी बसस्थानकातून कसोप-वायंगणी ही बस सुटली. या बसमधून अवघ्या १४ प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांसह, चालक, वाहकांकडून कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन होत असलेले निदर्शनास आले.
गाडी बसस्थानकात लागण्यापूर्वी बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. बसस्थानकात बस लागताच वाहक प्रवाशांना मास्क व्यवस्थित लावूनच गाडीत प्रवेश करण्याबाबत सूचना करीत होत्या. त्यानुसार प्रवाशीही मास्क व्यवस्थित लावल्याची खात्री करीत होते. वाहक हाताला सॅनिटायझर वेळोवेळी लावत असल्याचे निदर्शनास आले. थांब्यावर बस थांबली असता प्रवाशांची चढ-उतार सुरू होती. मात्र, एका सीटवर एकच प्रवासी प्रवास करीत होता. प्रवाशांकडूनही नियमांचे पालन केले जात होते.
एक तासाच्या प्रवासात किती वेळ तोंडावर मास्क
चालक
एक तासाच्या संपूर्ण प्रवासात मास्क तोंडावरचा काढला नव्हता. बसफेरी संपल्यानंतरच मास्क काढला.
वाहक
घाम येत असल्याने प्रत्येक फेरीनंतर मास्क बदलून फेरी संपल्यानंतर हात साबणाने धूत असल्याचे सांगितले.
प्रवासी
बसमध्ये चढल्यापासून उतरेपर्यंत संपूर्ण प्रवासात प्रवाशांनी मास्क एकदाही काढला नव्हता.
भाट्ये गाव
बसस्थानकातून बस गीताभवन थांब्यावर येताच दोन प्रवासी चढले. भाट्ये गाव थांब्यावर एक प्रवासी बसमधून उतरला. प्रवासात प्रवाशांनी मास्क काढला नव्हता. एका सीटवर एकच प्रवासी बसला होता.
कसोप फाटा
भाट्येनंतर कोहिनूर हाॅटल, कुर्ली थांब्यानंतर थेट कसोप फाटा येथे बस थांबली. तेव्हा एक प्रवासी बसमधून उतरला. विशेषत: गाडीत महिला प्रवाशांची संख्या अधिक होती. सॅनिटायझरचा वापर प्रवासी करीत होते.
कसोप गाव
भाजी विक्रेत्या महिलांसह, औषधे व अन्य कामानिमित्त शहरात गेलेले चार प्रवासी कसोप गावात उतरले. सकाळी भाजी विक्रीसाठी गेलेल्या महिला भाजी विकून परतल्या होत्या.
वायंगणी गाव
वायंगणी गाव हा शेवटचा थांबा आहे. या थांब्यावर एकूण आठ प्रवासी उतरले. विविध कामांसाठी गेलो असल्याचे प्रवाशांनी सांगितले. येता-जाता प्रवासात मास्क न काढल्याचेही सांगितले.