दापाेली तालुक्यातील चंद्रनगर शाळेतील मुलांनी शिमगाेत्सवानिमित्त सामाजिक संदेशही दिले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : शिमगोत्सव अर्थात होळीचा सण म्हणजे केवळ होम, पालखी, खेळे, रंगपंचमी एवढेच अपेक्षित नसून, दुष्ट विचार, दुष्ट प्रवृत्ती व अनिष्ट चाली-रितींचे दहन व त्या नष्ट करणे हा मतितार्थ आहे, हे लक्षात घेऊन दापाेली तालुक्यातील चंद्रनगर शाळेतील मुलांनी सामाजिक संदेश दिले. या मुलांना शिक्षक बाबू घाडीगांवकर व मनाेज वेदक यांनी मार्गदर्शन केले.
शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच होळी करणे, शिमगा करणे यांसारख्या वाक्प्रचारांचा शब्दशः अर्थ व त्यामागचा विशाल मतितार्थ कळावा, यासाठी शाळेतील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर व मनोज वेदक यांच्या नियोजनातून होलिकोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षकांनी होळी सणामागची मूळ संकल्पना व विशाल उद्देश यांसंबंधी विवेचन केले.
सुरक्षेसंबंधीचे सर्व निर्देश पाळून मुलांनी ‘कोरोना विषाणूची करुया होळी’, ‘जातीभेदांची करुया होळी’, ‘अंधश्रद्धेची करुया होळी’, ‘निरक्षरतेची करुया होळी’, ‘प्रदूषणाची करुया होळी’, ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ यासारख्या घोषणा देऊन प्रतिकात्मक फलकांची होळी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी होळी या विषयावर लिहिलेल्या स्वरचित कवितांचे व निबंधांचे वाचनही केले.
मुख्याध्यापिका रिमा कोळेकर, अर्चना सावंत, मानसी सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.