प्रकाश वराडकररत्नागिरी : राज्यभरातील रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सच्या नियुक्तीची जाहिरात राज्य शासनाने १० नोव्हेंबरला प्रसिध्द केली आहे. त्यानुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्हा शल्यचिकित्सकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ही पदे भरण्यास आरोग्य सेवा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. मात्र, जाहिरात प्रसिध्द होऊन २० दिवस झाले तरी कोणीही इच्छुक डॉक्टर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे फिरकलेला नाही. स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर वैद्यकीय अधिकारीच नाहीत. जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.जिल्हा रुग्णालय आणि त्याअंतर्गत असलेली जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये यामध्ये रुग्णांवर उपचारासाठी आधुनिक मशिन्स, यंत्रणा आहे. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा भार अधिक आहे.
असे असताना जिल्हा रुग्णालय व संबंधित रुग्णालयांमध्ये चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर व रुग्णालय व्यवस्थापनाची कारभार सांभाळताना कसरत होत आहे.सन १८८५मध्ये स्थापना झालेले रत्नागिरी जिल्हा रुग्णालय २०० खाटांचे असून, आणखी १०० खाटांच्या रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाअंतर्गत कळंबणी, दापोली व कामथे ही ३ उपजिल्हा रुग्णालये कार्यरत आहेत. तसेच मंडणगड, गुहागर, देवरुख, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रायपाटण, पाली ही ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत.
जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहे. मात्र, सोनोग्राफी मशीन वापरून रुग्णांना सेवा देणाºया रेडिओलॉजिस्टची पदे रिक्त आहेत. खासगी डॉक्टर्सच्या मदतीने आठवड्यातील मंगळवार, बुधवार व गुरुवार या तीन दिवशी सोनोग्राफीची सेवा रुग्णांना दिली जात आहे.
या स्थितीतही जिल्हा रुग्णालय व अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध कर्मचारी व यंत्रणेच्याआधारे रुग्णांना किमान चांगली सेवा देण्याचा प्रयत्न जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांच्या नेतृत्त्वाखाली अन्य डॉक्टर्स व कर्मचारी करीत आहेत.नवीन सी.टी.स्कॅन मशिन नाहीचजिल्हा रुग्णालयातील सी. टी. स्कॅन मशीन वर्षभरापूर्वीच नादुरुस्त झाले. हे मशीन दुरुस्तीवर मोठा खर्च करण्यात आला. मात्र, ती मशीन दुरुस्त होणार नसल्याने निर्लेखित करण्याचा निर्णय झाला. शासनाकडून जिल्हा रुग्णालयाला नवीन सी. टी. स्कॅन मशीन आॅगस्ट-सप्टेंबर २०१७ पर्यंत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते.मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरी या मशीनचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सी. टी. स्कॅनची सेवा खासगी रुग्णालयातून घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागातील रूग्णांसाठी फायदेशीर ठरणारे हे रूग्णालय आता समस्यांच्या गर्तेत अडकत चालले आहे.भूलतज्ज्ञांची तीनही पदे रिक्तजिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञांची तीन पदे मंजूर आहेत. मात्र, ही तीनही पदे रिक्त आहेत. शस्त्रक्रीयेसाठी भूलतज्ज्ञांची अत्यंत आवश्यकता असते. मात्र ही पदेच रिक्त असल्याने रुग्णालयाला खासगी तज्ज्ञांची सेवा घ्यावी लागते. जिल्हा रुग्णालयाला स्वत:चा भूलतज्ज्ञ मिळणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे. रिक्त पदांच्या भरतीसाठी आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी यांनी प्रयत्न चालवलेले असताना ही पदे अद्याप भरली गेलेली नाहीत.