खेड : माणूस हा नेहमी शरीरानेच अपंग असतो असे नाही, तर काहीजण राजकारणात राजकीय बुद्धीने अपंग असतात. काहीजण धडधाकड असतात; पण ते डोक्याने अपंग असतात. आपण मात्र आपलं काम करायचं असतं, असे मत खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी व्यक्त केले.
अपंग संस्थेतर्फे दिव्यांगांसाठी वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे राज्य चिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडकर बाेलत हाेते. यावेळी त्यांनी सांगितले की, आतापर्यंत खेड नगरपालिकेत अपंगांकरिता कधीही निधी खर्च झाला नव्हता. मात्र मी माझ्या दिव्यांगासाठी हा निधी खर्च करायला सुरुवात केल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या व दिव्यांग बांधवांच्या सदैव पाठीशी राहू, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला भाजपचे शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, उज्ज्वला पाटणे, अस्मिता सोहनी, भाजपचे शरद सोहनी, चिपळूणचे समाजसेवक अशोक भुस्कुटे, समाजसेविका ऋतुजा रांजणे उपस्थित होते. यावेळी अनिकेत कानडे यांनी यापेक्षा मोठा मेळावा आपण घेणार असून, संस्थेच्या पाठी नक्की आहोत, असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपंग संस्थेचे अध्यक्ष ओंकार पाटणे, विनय कोकाटे, मंदार कुलकर्णी, निखिल महाकाळ, अपूर्व काटदरे, शैलेश पाटणे, काैशल पवार यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार आपटे यांनी केले. आभार निखिल महाकाळ यांनी मानले.