खेड : भाजप नेते किरीट सोमय्या यांना भेटून पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली, हा जावईशोध वैभव खडेकर यांनी लावलेला दिसतो. रामदास कदम कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नसतो, मी सांगून आणि समोरून अंगावर जातो. होय! प्रसाद कर्वे यांचा माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्यासाठी मी उपयोग करून घेतला. बाकी माझा व त्यांचा कोणताही संबंध नाही. किरीट सोमय्या यांना भेटण्याचा किंवा त्यांचे थोबाड पाहण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त आमच्या कुटुंबांमध्ये भांडणे लावण्यासाठी हे कटकारस्थान आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते तथा माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना दिले आहे.
मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी दि. १८ रोजी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. त्यांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आमदार कदम यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिध्दीस दिले आहे. जे मनसे पक्षाचे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे, असे क वर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप केले आहेत. माझी बदनामी करणारे, जनमानसामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझ्याबाबतीत गैरसमज पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछूटपणे आरोप केले आहेत. त्यांचा मी तीव्रपणे निषेध करीत आहे. त्यांच्याविरोधात जे आरोप केले होते, त्यासंदर्भात ते न्यायालयात गेले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात निकाल लागला, तर १ महिन्यासाठी त्यांना स्थगिती दिली आहे. त्याचा विपर्यास करून, जणू काय न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली असे भासवून त्यांनी शिमगाच साजरा केला आहे, याचे आपल्याला आश्चर्य वाटते, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी मातोश्रीच्या पायऱ्या व माजी पालकमंत्र्यांच्या पायऱ्या ज्यांनी शिवसेनेतून तिकीट मागण्यासाठी झिजविल्या, त्या नेत्याच्या मैत्रीचा हा परिणाम असावा असे वाटते. निवडणुकीपूर्वीच मी पत्रकार परिषद घेऊन, यापुढे मी कोणतेही पद घेणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे मंत्री होण्याचा व नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तमाम महाराष्ट्रातील जनता रामदास कदम यांना चांगली ओळखते. महाराष्ट्राने, कोकणाने व शिवसेनेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्याची परतफेड या जन्मी होऊ शकणार नाही. अशा बिनबुडाच्या आरोपांना आपण भीक घालीत नाही. शेवटी सत्य जनतेपुढे येईलच व भ्रमाचा भोपळा फुटेल, असा दावा त्यांनी यातून व्यक्त केला आहे.