चिपळूण : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू असताना आरोग्य यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी अचानक ऑक्सिजनचा तुडवटा भासल्याने मोठा गोंधळ उडाला. अखेर आमदार भास्कर जाधव, शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून खडपोली औद्योगिक वसाहतीमधून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे रुग्णांसह आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला.
सध्या तालुक्यात ५०० हून अधिक रुग्ण कोरोनाबाधीत असून, त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यामध्ये कामथे उपजिल्हा रुग्णालय महत्त्वाची भूमिका निभावत आहे. या रुग्णालयात ११७ बेड आहेत. त्यामध्ये ८२ ऑक्सिजन बेड आहेत. तूर्तास हे रुग्णालय ‘हाऊसफुल्ल’ असून तेथे ऑक्सिजनचा पुरवठाही तितकाच करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी या रुग्णालयांसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ३ ड्युरा सिलिंडर उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे याठिकाणी ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असतो. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे गुरुवारी अचानक ऑक्सिजनचा तुडवडा भासू लागला. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांसह आरोग्य यंत्रणेत गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकाराविषयीचा संदेश आमदार शेखर निकम यांना काहींनी पाठविला. तो वाचताच निकम यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ कामथे रुग्णालयाशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी यांनी खडपोली औद्योगिक वसाहतीत धाव घेतली. तेथील एका खासगी कंपनीकडून ऑक्सिजन उपलब्ध करत कामथे रुग्णालयास दिला. त्यामुळे कामथे रुग्णालयात निर्माण झालेली अडचण दूर झाली. मात्र, हे ऑक्सिजन २ दिवसच पुरणार असल्याने ऑक्सिजनच्या पर्यायी व्यवस्थेसाठी तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.
..................................
कामथे उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजनविषयीचा संदेश मिळाला. त्यामध्ये ऑक्सिजन संपले रुग्ण दगावतील, असा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे गांभीर्याने लक्ष देत आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यावर तत्काळ उपाययोजना केली. रुग्णालयास आवश्यक असलेले ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- शेखर निकम, आमदार, चिपळूण
......................................
कामथे रुग्णालयाला वर्षभर लोटेतील क्रायोगॅस कंपनीकडून ऑक्सिजन पुरवठा केला जातो. मात्र, या कंपनीने ऑक्सिजन संपल्याने रात्री ८ नंतर पुरवठा होणार नसल्याचे कळविले. ही गंभीर बाब जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, तसेच तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली. रात्रीपर्यंत ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास रुग्णांना धोका निर्माण होणार होता. त्यामुळे तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
- डॉ. अजय सानप, वैद्यकीय अधीक्षक, कामथे रुग्णालय