रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २८८ शिक्षकांचा आंतरजिल्हा बदल्यांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी तीव्र विरोध केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परिषद भवनातील सर्वच विभागांचे कामकाज ऑनलाईन सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदाच परिषद भवनात उपस्थित राहण्याला प्राधान्य दिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि उपाध्यक्ष उदय बने यांच्या अनुपस्थितीचा फायदा ग्रामपंचायत, प्राथमिक शिक्षक विभागातील प्रभारींनी घेतला. शिक्षण विभागाने २४८ शिक्षकांच्या, तर ग्रामपंचायत विभागाने ७६ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे प्रस्ताव तयार केले आहेत. ते कोणत्याही क्षणी मंजूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये मंजूर असलेल्या शिक्षकांच्या एकूण पदांपैकी १००० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांच्या भरतीसाठी शासनाने अनेकदा घोषणा करुनही त्याची अमलबजावणी झालेली नाही. त्यातच कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया आणखी काही महिने स्थगित करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे शिक्षक भरती रखडलेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभर जिल्हा परिषद शाळांमधील कामकाज संपूर्ण ठप्प झाले असले तरी ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. त्यातच शिक्षकांची मंजूर झालेली पदे भरण्याकरिता जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात ४० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या होत्या. १० टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याने उर्वरित २४८ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या रखडल्या होत्या. आता रिक्त पदे असल्याने आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव मंजूर करु नयेत, अशी भूमिका शिक्षण सभापती मणचेकर यांनी घेतली आहे. मात्र, सभापतींच्या भूमिकेवर प्रशासन काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.