राजापूर : तालुक्यातील मिळंद गावचे सुपुत्र ह. भ. प. नित्यानंद वसंत आयरे यांनी वारकरी शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला असून, त्यांनी कीर्तन या विषयात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. चार वर्षांचा वारकरी शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कीर्तन या विषयात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. याबद्दल सर्वस्तरातून आयरे यांचे कौतुक होत आहे.
वैद्यकीय साहित्याचे वाटप
राजापूर : तालुक्यातील जैतापूर येथील फणसे पेट्रोल पंप एजन्सीचे मालक अमृत फणसे यांनी कोरोना महामारीत उपयुक्त ठरेल, असे विविध साहित्य येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले. दळे गावातील फणसे यांचे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान आहे.
लावणीची कामे ठप्प
राजापूर : गेला आठवडाभर पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील पावसावर अवलंबून असलेली भात लावणीची कामे ठप्प झाली आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास भातशेतीवर रोग पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऑक्सिजन बेड कक्ष
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या देणगीतून ऑक्सिजन बेड कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन संतोष थेराडे, सर्व देणगीदार व परिसरातील लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
बससेवा सुरु
मंडणगड : तिडे - तळेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरुन मंडणगड - तिडे - तळेघर- नालासोपारा बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. ही बस मंडणगड येथून दुपारी १.२९ वाजता सुटून रात्री ९.३० वाजता नालासोपारा येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाला सकाळी ६.२९ वाजता नालासोपारा येथून मंडणगड येथे यायला सुटेल.
प्रिंटर भेट
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित येथील ए. जी. हायस्कूल ज्युनियर काॅलेजचे सेवानिवृत्त शिक्षक प्रा. एम. जी. कुलकर्णी यांनी शाळेला दोन प्रिंटर भेट दिले आहेत. यावेळी शाळा समिती अध्यक्ष निलिमा देशमुख, मुख्याध्यापक सतीश जोशी, दिनेश खटावकर उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी अभ्यंकर यांनी केले.
शेतकरी चिंतेत
दापोली : गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यातच भातलावणी सुरु असल्याने शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. सध्या शेतकरी भातलावणीच्या कामात व्यस्त आहेत. शेतात उपलब्ध होणार्या पाण्यावर भातलावणी केली जात आहे.
शीतपेटीचे वाटप
गुहागर : कृषी विभागाच्या जिल्हा सेस मत्स्य शीतपेटी योजनेंतर्गत कुडली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांंच्या प्रयत्नाने मिळालेल्या शीतपेटीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सभापती पूर्वी निमूणकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, सरपंच चैतनी शेट्ये, उपसरपंच संतोष पावरी उपस्थित होते.
युवाशक्ती अध्यक्षपदी कदम
खेड : कोकण खेड युवाशक्तीच्या अध्यक्षपदी अभिजीत कदम यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी - चिंचवड येथील पार्वती पतसंस्था सभागृहात काही मोजक्याच पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.