रत्नागिरी : रत्नागिरीत सोमवारी तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांचे विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. वेगवेगळ्या अंगांनी या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिस अविश्रांत हा तपास करत आहेत. त्यामुळे लवकरच ठोस माहिती हाती येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.शिकाऊ परिचारिका म्हणून काम करणाऱ्या रत्नागिरीतील एका तरुणीवर सोमवारी सकाळी लैंगिक अत्याचार झाले. साळवी स्टॉप येथे आपल्याला गुंगीचे औषध देण्यात आले आणि त्यानंतर आपल्यावर लैंगिक अत्याचार झाले, अशी तक्रार तिने पोलिसांकडे दिली आहे. ती बेशुद्ध झाल्यानंतर सुमारे दीड ते दोन तासांनी तिला शुद्ध आली. त्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला.राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या सातत्याने येत असताना रत्नागिरीतच हा प्रकार व्हावा, हे अनपेक्षित असल्याने रत्नागिरी हादरली. सोमवारी दुपारपासून अनेक सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयात जमले होते. रात्री ११:३० वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयातील जमाव कायम होता. यादरम्यान दोन वेळा रास्ता रोको करण्यात आला आणि आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.रात्रीच पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चार ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास अधिक जलद गतीने व्हावा तसेच यातील सर्व बारकावे तपासात पुढे यावेत, यासाठी पोलिसांच्या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक स्मिता सुतार या पथकाच्या प्रमुख असून, या पथकामध्ये तीन महिलांसह ११ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
रत्नागिरीतील लैंगिक अत्याचारप्रकरणी विशेष पथक नियुक्त, पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
By मनोज मुळ्ये | Published: August 27, 2024 4:00 PM