फोटो मजकूर
रत्नागिरीतील जिल्हा प्रशिक्षण पथकात बुधवारी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यशाळा व कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रयत्नशील होतो. आज कोविडच्या साथीमध्ये संसर्गजन्य नसलेल्या आजारांच्या (नॉन कम्युनिकेबल डिसीज) लोकांसाठी विशेष पथक तयार करून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्यक्त केला.
येथील जिल्हा प्रशिक्षण पथकात बुधवार, १७ रोजी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ कार्यशाळा व कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बबीता कमलापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले गावडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डाॅ. सतीश गुजलवार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर आठवड्याला ए. एन. सी. आठवडा राबविण्यात यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी मनोगतात कोरोना कालावधीमध्ये कशा पद्धतीने समस्या उत्पन्न होत होत्या व त्या समस्यांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना साथीवर मात केली, याबाबत वरिष्ठांना धन्यवाद दिले आणि यापुढे भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करू, अशी ग्वाही दिली.
कोकणातील शिमगा उत्सवासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड साथीच्या नियंत्रणासाठी दररोज २० स्वॅबचे नमुने घेण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिमगोत्सवासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांची आरटीसीपीआर चाचणी करण्याची सूचना केलेली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांनी दिली. डॉ. दिनेश सुतार यांनी आभार व्यक्त केले.