रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भावनगर ते कोच्युवेली स्पेशल साप्ताहिक एक्स्प्रेस दि. ४ मे पासून पूर्णत: रद्द करण्यात आली आहे. यशवंतपूर ते कारवार साप्ताहिक एक्स्प्रेस स्पेशल मंगळूर जंक्शनदरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. मात्र, ही गाडी कारवार ते मंगळूर जंक्शनपर्यंतच धावणार आहे.
संरक्षक जाळ्या
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गाच्या रुळावर होणारे अपघात आणि आत्महत्या टाळण्यासाठी रेल्वे महामंडळाने पुलाच्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर आत्महत्येत वाढ होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत. रेल्वे मार्गावरील विद्युत वाहिन्यांना कोणीही स्पर्श करू नये यासाठी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
लसीकरण केंद्राची मागणी
देवरूख : लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने केंद्रे निश्चित केली आहेत. मात्र, संगमेश्वर येथे लसीकरण केंद्र नसल्याने केंद्र जाहीर करण्याची मागणी येथील श्रीदेवी सोळजाई देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आली आहे. कमिटीतर्फे तहसीलदार सुहास थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे.
अनुदानाच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी : कोरोना संसर्गामुळे संकटात सापडलेल्या रिक्षा व्यवसायाला राज्य सरकारने गेल्या महिन्यात अर्थसाहाय्य करण्याचे घोषित केले होते. मात्र, पंधरवडा लोटला तरी रिक्षाचालकांना अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही. रिक्षाचालकांच्या आधार लिंक बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाइनप्रणाली विकसित करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑनलाइन स्पर्धा
रत्नागिरी : माऊली प्रसादिक रत्नागिरी जिल्हा भजन मंडळातर्फे ‘गजर टाळ-मृदंगाचा ..छंद हरिनामाचा’ गीतगायन स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. दि. १५ मेपर्यंत स्पर्धा होणार असून, स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धकांनी दहा मिनिटांचा व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन केले आहे.
तळवडे गावात कडक निर्बंध
राजापूर : तालुक्यात तळवडे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. गावातील रुग्णसंख्या वाढत असल्याने ग्रामपंचायत व ग्रामकृतीदलाने गावात कडक निर्बंध जारी केले आहेत. गावात येणाऱ्या व्यक्तीला कोरोना चाचणी बंधनकारक केली असून, अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाइन बैठक
खेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा युवासेनेची ऑनलाइन बैठक युवासेना सचिव सूरज चव्हाण, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. युवासेना जिल्हाध्यक्ष अजिंक्य मोरे यांनी १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी केंद्र वाढविण्याची मागणी केली.
जलस्रोतांचे संवर्धन
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात असणाऱ्या नैसर्गिक जलस्रोताचे संवर्धन करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. घाटातील झऱ्यांचे पाणी एकत्रित करून ते सिंचन व डोंगर उतारावरील वृक्ष लागवडीसाठी वापरण्याच्या दृष्टीने खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे.