शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्याने उद्योग क्षेत्राचे आर्थिक गणितच विस्कटले. मात्र, अनलॉकची प्रक्रिया मे महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांची आर्थिक चाके संथ गतीने का होईना हळूहळू रूळावर येत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून मे महिन्यापर्यंत सर्व उद्योगधंदे बंद झाले. या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे हात थांबल्याने ते रिकामे झाले. परिणामी उपासमारीची वेळ आली. उद्योजकांपुढे तर बाकीचा खर्च कसा भागवायचा, हे भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. अखेर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक प्रक्रियेला प्रारंभ झाला आणि उद्योगांना काही नियमांच्याअधीन राहून सुरु करण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे काही उद्योग सुरु झाले आहेत.
रत्नागिरीत मध्यम उद्योग मोजकेच आहेत. त्यांच्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. मात्र, लघुउद्योजकांकडे तशा यंत्रणा नसल्याने छोट्या उद्योजकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अक्षरश: शुन्यात जावे अशी उद्योकांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही परिस्थिती स्थिर झालेली नाही. त्यातच दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक कामगारांची संख्याही घटलेली आहे. त्यामुळे अजूनही उद्योजकांचे काम ५० टक्के बंद आहे.वाहतूकही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे कच्चा माल येणे आणि उत्पादन बाहेर पाठविणे, अशा दोन्ही बाबींसाठी समस्या येत आहे. बाहेरच्या राज्यातील मजूर परतणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे सध्या स्थानिकांवरच मदार ठेवत उद्योगधंदे हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. येथील औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय या उद्योजकांच्या सहकार्यासाठी पुढे येत असल्याने काहीअंशी या समस्या आता दूर होत आहेत.जिल्ह्यात ३६० कोटींचा फटका बसलामे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आता हळूहळू रत्नगिरी जिल्ह्यातील उद्योगपूर्व पदावर येत आहेत. सुमारे दोन महिने पूर्णत: उद्योग बंद राहिल्याने जिल्ह्यातील सातही क्षेत्रात सुमारे ३६० कोटींचे नुकसान झाले आहे. अजूनही कामगार, कच्चा माल आदींसह अन्य बाबतीत अडचणी येत आहेत. परंतु आता हळूहळू उद्योग पूर्वपदावर येत आहेत.
शासनाने शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजकांना कर्ज, वीजबिले व अन्य बाबींमध्ये सवलत देण्याची गरज आहे. किमान छोट्या उद्योगांना या परिस्थितीत मदत दिली पाहिजे.- प्रमोद गांगण, उद्योजक, खेर्डी औद्योगिक वसाहत, चिपळूण.
निम्म्या कंपन्या जेमतेम सुरु आहेत. पन्नास टक्केच कामगार आहेत. बाहेरून येणारे मटेरियल वेळेवर येत नाही. तयार मालाला वेळेत मागणी नाही. ही स्थिती किती काळ राहील सांगता येत नाही.- डॉ. प्रशांत पटवर्धन,अध्यक्ष, लोटे
रत्नागिरीत सुमारे ८० ते ९० टक्के लघु उद्योजक आहेत. बहुतांश उद्योगांमध्ये स्थानिक आणि बाहेरच्यांचे प्रमाण निम्मे निम्मे आहे. मात्र, आता बाहेरचा मजूर वर्ग अद्याप आलेला नसल्याने पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झालेले नाहीत. बसेस किंवा ट्रेन नियमित सुरू झाल्या की, हे कामगारही परततील.- दिगंबर मगदूम,अध्यक्ष, रत्नागिरी उद्योजक संघटना