विशेष मोहीम
रत्नागिरी : शहरात सध्या मोकाट जनावरांचा वावर वाढला असल्याने नगर परिषदेने जनावरे पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यावरही जनावरे कळपाने ठाण मांडून बसत आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, जनावरांच्या झुंजीमुळे अपघात वाढले आहेत.
मोफत आरोग्य शिबिर
चिपळूण : येथील ऑम्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरतर्फे दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सावर्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत कॅन्सर रोग निदान शिबिर आयोजित केले आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. इसाक खतीब व अध्यक्ष उदय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे.
संशोधनाची दखल
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक सचिन सनगरे यांच्या संशोधन लेखाची दखल महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणेतर्फे घेण्यात आली आहे. बचत गट महिलांसाठी आव्हाने, आर्थिक प्रश्न, शासकीय योजना, बाजारपेठ यांचा सखोल अभ्यास त्यांनी मांडला आहे.
पटसंख्येत घट
रत्नागिरी : जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या चिंतेचा विषय बनला आहे. १,३८५ शाळा वीसपेक्षा कमी पटाच्या आहेत. गेल्या दोन वर्षात पटसंख्येत घट वाढली आहे. शहराकडे ओढा वाढल्याने व इंग्रजी माध्यमांकडे कल असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे.