रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील घटत चाललेल्या विद्यार्थीसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडून नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता यावे, यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून ‘स्पोकन इंग्लिश’ हा कार्यक्रम डाएटकडून राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आज विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने व पालकांचा कल खासगी शाळांमध्ये मुलांना घालण्याकडे असल्याने सुमारे एक हजार प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांंचा लूक बदलत चालला असतानाच त्यामध्ये मोफत शिक्षणही दिले जात आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्यासाठी डिजिटल स्कूल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यातच शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना जास्तीत जास्त प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या शाळांमधून उत्तम दर्जाचे शिक्षण मुलांना दिले जात असल्याचे आज पुढे येत आहे. जागतिक भाषा असलेल्या इंग्रजीमध्येही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी डाएटचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी स्पोकन इंग्लिश कार्यक्रम राबवण्याची धडपड नवीन शैक्षणिक वर्ष चालू होण्यापूर्वीच सुरु केली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने इंग्लिश बोलता यावे, यासाठी प्रधान सचिव नंदकुमार यांच्या प्रेरणेने सुरु होत असलेल्या नव्या शैक्षणिक क्रांतीसाठी शिक्षकांना सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन प्राचार्य शेख यांनी केले आहे. (शहर वार्ताहर)प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शैक्षणिक वातावरण बदलून गेले आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढत आहे. शिक्षक विविध शाळांना भेट देऊन मुलांच्या अध्ययनासाठी नवनवीन उपक्रम राबवत आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’
By admin | Published: May 11, 2016 11:12 PM