पाली : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या १५ दिवसांच्या कडक निर्बंधांनंतरही पाली रस्त्यावर माल वाहतूक वाहनांखेरीज दोन डेपोमधील एस.टी. बसेसच्या फेऱ्यांची वर्दळ सुरू होती. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांखेरीज बँका, पतसंस्था, खाजगी दवाखाने सुरू असल्याने महामार्गावर तुरळक नागरिकांची उपस्थिती सुरू होती, तर एस.टी. स्थानकावर प्रवासी दिसत होते.
पालीमधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल स्टोअर्स, बँका, पतपेढ्या, खाजगी दवाखाने, भाजीची दुकाने सुरू होती. या दुकानांवर ग्राहकांची तुरळक गर्दी दिसत होती, तर बँकांसमोर सकाळी गर्दी दिसत होती. मात्र, सकाळी ११ नंतर उन्हाच्या झळांची सुरुवात झाल्यावर गर्दी हळूहळू कमी झाली, ती सायंकाळी दिसेनाशी झाली.
महामार्गावर लांजा डेपो, राजापूर डेपोमधून रत्नागिरीकडे जाणाऱ्या बसफेऱ्या सुरू होत्या. रत्नागिरीहून सकाळी कोल्हापूर मार्गावर सांगली, मिरज, जत आणि कोल्हापूर या गाड्या धावल्या. मात्र, दुपारनंतर ही सेवा बंद करण्यात आली. मात्र, माल वाहतूक वाहनांची वर्दळ नियमित सुरू होती.
पाली विभागातून रत्नागिरीमध्ये कंपनी, कारखाने आणि शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे असल्याने या वर्गाची उपस्थिती एस.टी. स्थानक पालीमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणावर दिसली. लांजा डेपोतून पाली विभागातील गावांमध्ये सुटणाऱ्या लोकलफेऱ्या नियमित सुरू होत्या, तर रत्नागिरीमधील लोकलफेऱ्या पूर्ण बंद होत्या.
परवानगी नसताना काही दुकाने व टपऱ्या उघड्या असल्याचे निदर्शनास आल्यावर पाली सजाचे सर्कल सुरेंद्र कांबळे, सरपंच विठ्ठल सावंत, कोतवाल गराटे यांनी या दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना समज दिली. त्यानंतर ही दुकाने बंद करण्यात आली. हॉटेलमधून पार्सल सुविधा उपलब्ध असल्याने या हॉटेलांची एक खिडकी योजना सुरू होती.