रत्नागिरी : गोवा येथे पार पडलेल्या ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती किनरे या सख्खा भगिनींनी योगासन स्पर्धेत प्रत्येकी दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी सहा पदके पटकावली. या सुवर्णकन्यांचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी कौतुक केले. राज्याला या सुवर्णकन्यांचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
किनरे भगिनींनी पटकावलेल्या सहा पदकांमुळे महाराष्ट्र संघाला योगासनात सर्वसाधारण विजेतेपद मिळवता आले. गोवा येथे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हाेते. रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती किनरे या दोन्ही भगिनींनी आर्टिस्टिक पेअरमध्ये सुवर्ण, ऱ्हिदमिक पेअरमध्ये रौप्य आणि आर्टिस्टिक ग्रुपमध्ये सुवर्ण अशी सहा पदके मिळवली.पूर्वा-प्राप्ती यांना योगासनांचे राज्य क्रीडा मार्गदर्शक योगशिक्षक रविभूषण कुमठेकर यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा संचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे, संजय सबनीस, अनिल चोरमुले, माणिक पाटील, सुहास पाटील, रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी तसेच महाराष्ट्र योगासन फेडरेशनचे अध्यक्ष संजय मालपाणी, सचिव राजेश पवार, सतीश मोगावकर यांनी किनरे भगिनींचे अभिनंदन केले.
पूर्वा-प्राप्तीची लक्षवेधी कामगिरीपॅरिस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तीन रौप्य पदक विजेत्या पूर्वाने आपली लहान बहीण प्राप्तीसोबत पदक पटकावले. आर्टिस्टिक पेअरमधील या दोघींची कामगिरी लक्षवेधी ठरली. सर्वोत्तम कसरत आणि लवचिकता संतुलन या सर्वोत्तम कामगिरीतून त्यांनी पदकाचा बहुमान पटकावला. मोठ्या बहिणीला सर्वोत्तम साथ देत प्राप्तीनेही लक्षवेधी कसरती केल्या.