लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : ऐन भातशेती लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी, नैसर्गिक झरे, पऱ्याच्या पाण्याचा आधार घेऊन भातलावणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. पाणी नसल्याने शेतं कोरडी पडली असून लागवड केलेल्या भातरोपांचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चिपळूण तालुक्यात यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला. सुरूवातीला पावसाने जोर धरल्याने भातपेरणी व फोडणीच्या कामात शेतकरीराजा गुंतला होता. वेळेत पावसाचे आगमन व पेरणी झाल्याने जून महिन्याच्या अखेरीस लागवडीयोग्य रोपे तयार झाली. त्यामुळे सध्या भातलावणीच्या कामानेही वेग घेतला आहे. भातलावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे़. मात्र, गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांसमाेर पेच निर्माण झाला आहे. लावणीसाठी शेतात चिखल करावा लागत असल्याने शेतात मुबलक पाण्याची गरज असते. पाऊसच गायब झाल्याने शेतात पाणी नाही. शेतात फोडणी केलेली जमिनीची माती सुकली आहे. त्यामुळे काही भागांतील भातलावण्या खोळंबल्या आहेत. लागवडी योग्य भातरोपे आजही शेतात उभीच असून शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. याबरोबरच शेत कोरडी झाल्याने लागवड केलेली भातरोपेही सुकून मरण्याची शक्यता आहे तसे घडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. असे असतानाच तालुक्यातील काही भागांमधील शेतकऱ्यांनी नदी, ओढे, पऱ्यांसह नैसर्गिक झऱ्याचे पाणी शेताकडे वळविले आहे. त्यासाठी छोटे-छोटे पाट काढले जात आहेत. काही ठिकाणी पंप लावून, पाईपद्वारे, दगड-मातीच्या सहाय्याने पाणी शेतात घेत आहेत. या नैसर्गिक स्रोतांच्या पाण्यावर सध्या भातलावणी केली जात आहे.
-------------------------------
गेले दहा दिवस पाऊस गायब झाल्याने भातलावणीची कामे खोळंबली आहेत. एवढंच नव्हे तर शेतही कोरडी पडत असल्याने लावणीनंतरची भातरोपे जगणार कशी? असा प्रश्न पडला आहे. कोरोना महामारी, वाढती महागाई, इंधन दरवाढीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच वेळीच भातलावणीची कामे मार्गी लागली नाही तर शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडणार आहे.
- भूषण कांबळी, शेतकरी, कापसाळ.
------------------------------
भातलावणीसाठी नैसर्गिक झऱ्याचे पाणी शेताकडे वळविण्यात आले आहे.