बसस्थानकाचे काम सुरू
रत्नागिरी : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू झाले असून कामाला गती प्राप्त झाली आहे. खर्चाच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. ठेकेदाराला केलेल्या कामाचे पैसे महामंडळाकडून वर्ग केले असून ठेकेदाराने कामाला प्रारंभ केला आहे.
पाणी उपलब्धतेची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील नऊ बसस्थानक तसेच अन्य छोट्यामोठ्या बसस्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून तातडीने उपलब्धता करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. पाणपोईची स्वच्छता करण्यात येऊन स्वच्छ पाण्यासाठी फिल्टर सुविधा बसविण्याची मागणीदेखील केली जात आहे.
नवीन वेतन श्रेणी
रत्नागिरी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आगामी आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याबाबत नवीन वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना होणार आहे. कोरोनामुळे यावर्षी कमी करवसुली झाली असली तरी चांगले वेतन मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पदव्युत्तर परीक्षा
रत्नागिरी : कोरोनामुळे यावर्षी मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र १ व सत्र ३ मधील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा २५ मे ते ५ जूनपर्यंत घेण्यात येणार आहेत.
महाविद्यालयाचे यश
दापोली : मुंबई विद्यापीठाच्या ५३व्या युवा महोत्सवामध्ये उत्तर रत्नागिरी विभागात दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजने सहा विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त करून सर्वसाधारण सांघिक विजेतेपद पटकावले आहे. सुगम संगीत प्रकारात तन्वी गुरवने प्रथम क्रमांक मिळविला.
आंदोलनाचा इशारा
देवरूख : कोकण रेल्वेमार्गावरील नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेस गाड्या संगमेश्वर रेल्वेस्थानकावर थांबा मिळवून देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येऊनसुद्धा प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. चिपळूण, निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपतर्फे थांबा न मिळाल्यास दिनांक १ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.