टेंभ्ये : रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभार केवळ एका शिक्षणाधिकाऱ्यावर सुरु आहे. राज्यातील हे एकमेव उदाहरण असून, शासनाचे जिल्ह्याकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. विशेष म्हणजे दहावी बारावीच्या परिक्षा तोंडावर आल्याने आता पथकांची ‘भरारी’ कशी होणार? असा प्रश्न शिक्षण विभागालाच पडला आहे.गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात प्राथमिक व निरंतर विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारीच दिलेला नसल्याने, हे विभाग प्रभारी म्हणूनच काम करीत आहेत. या सर्वात भर म्हणून, एकाच वेळी उपशिक्षणाधिकारी रजेवर असल्याने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे यांच्यावर कामाचा ताण आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.जिल्ह्यात शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची कमतरता हा कायमचा चर्चेचा विषय बनला आहे. एकावेळी सर्व शिक्षणाधिकारी कार्यरत आहेत, असे अपवादात्मक परिस्थितीतच घडले असेल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शिक्षण विभागाच्या बाबतीत उदासीन असल्याने परिपूर्ण अधिकारी वर्ग भरण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न होत नसल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात शिक्षण सेवा वर्ग एकची किमान चार पदे कार्यरत असणे आवश्यक आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांपैकी सध्या केवळ शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावरच पूर्णवेळ अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित सर्व ठिकाणी प्रभारीच कार्यभार पाहत आहेत.प्राथमिक विभागाचे दोन उपशिक्षणाधिकारी व माध्यमिक विभागाचा एक उपशिक्षणाधिकारी रजेवर असल्याने, विस्तार अधिकाऱ्यांच्या मदतीने शिक्षण विभागाचे काम करुन घेण्याची वेळ अहिरे यांच्यावर आली आहे. तीन शिक्षणाधिकाऱ्यांपैकी सोमवारी हजर होणार असल्याचे बोलले जात आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या आयोजनामध्ये शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. या प्रत्येकाचे एक स्वतंत्र भरारी पथक कार्यरत असते. या संदर्भात गैरमार्ग विरूद्ध कृ ती कार्यक्रमाच्या सभा सुुरु आहेत. या सभांना त्यांची उपस्थिती आवश्यक असते. या भरारी पथकांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारीवर्गच नसल्याने शिक्षण विभागाचा कारभारच सध्या विस्कळीत झाला आहे.एकंदरीत जिल्ह्यात शिक्षण विभागातील सर्व अधिकारी पदे भरली जावीत, यासाठी लोकप्रतिनिधी स्तरावरून विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या शासनाच्या सुरु असलेल्या विविध योजना सक्षमपणे कार्यान्वित करण्यासाठी अधिकारी वर्ग परिपूर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला येणारा उपेक्षितपणा विचार करायला लावणारा आहे. (वार्ताहर)पदेमंजूररिक्तगटशिक्षणाधिकारी९३उपशिक्षणाधिकारी४१शिक्षणाधिकारी३२डाएट प्राचार्य११शालेय पोषणआहार अधीक्षक११
पथकांची ‘भरारी’ थांबणार?
By admin | Published: February 09, 2015 10:51 PM