गुहागर , दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा व अन्य मागण्यांसाठी संप करण्यात आला. मात्र, गुहागर आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये फूट पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काही गाड्या मार्गस्थ झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
मध्यरात्रीपासून एस. टी. संप सुरु झाला आहे. मात्र, वेतन करार दर चार वर्षांनी होतो आणि वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू होतो. या कारणावरून महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना ही संघटना संपात सहभागी झाली नाही. मात्र, या कामगार सेना संघटनेतील काही सदस्य संपात सहभागी झाले होते. जे कामगार या संपात सहभागी झाले नाहीत.
त्यामध्ये सुभाष पावसकर, बाळा पेडणेकर, अभिषेक भिडे व अन्य काहीजणांचा समावेश आहे. संपात सहभागी नसणाऱ्या कामगारांनी एस. टी.च्या काही फेऱ्या मार्गस्थ केल्या.
मात्र, हे होत असताना महाराष्ट्र कामगार संघटना मान्यताप्राप्त सदस्य कामगारांनी टाळ्या वाजवून जोरदार घोषणाबाजी केली. या एस. टी. फेऱ्या मार्गस्थ होताना गुहागर पोलिसांनी चोख बंदोबस्तात मार्गस्थ केल्या.