मेहरून नाकाडे
रत्नागिरी : घरची परिस्थिती बेताची असतानाही शाळेतील अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून कोणत्याही जादा अभ्यासवर्गाशिवाय तालुक्यातील धामणसे येथील श्रीकांत रवींद्र रहाटे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवले आहेत. अभियंता होण्याचे श्रीकांतचे ध्येय आहे. भविष्यात आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याची वाटेल ते कष्ट करण्याची तयारी आहे.धामणसे येथील श्रीकांत हा न्यू इंग्लिश स्कूल, नेवरे शाळेचा विद्यार्थी आहे. धामणसे ते नेवरे हे अंतर चार किलोमीटरचे आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत सकाळी दहा वाजता जादा वर्ग असतो. त्यानंतर अकरा ते पाच शाळा व शाळेच्या येण्याच्या अथवा जाण्याच्या वेळेत बस नसल्याने पायपीट ही ठरलेली असते.
एखादवेळेस कोणी दुचाकीस्वार वाटेत भेटला तर सोडायचा. मात्र, श्रीकांतची मित्रांसमवेत दररोज येता-जाता पायपीट ही ठरलेलीच. घरी पोहोचेपर्यंत त्याला सहा वाजत असतं. घरी गेल्यावर गृहपाठ आटोपून तो नियमित दोन ते अडीच तास अभ्यास करीत असे.श्रीकांतला वाचनाची आवड आहे. त्यामुळे प्रश्न वाचून उत्तरे स्वत:च्या शब्दात मांडणे सोपे झाले. त्याला दहावी परीक्षेत इंग्रजी विषयात ८१, मराठी ७६, हिंदीत ७४, विज्ञान ८१, सोशल सायन्स ९० तर गणितात ९४ गुण मिळाले आहेत. श्रीकांतचे वडील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे गेली आठ वर्षे वॉचमनचे काम करत आहेत.
आई गृहिणी असून, श्रीकांतचा धाकटा भाऊ सहावीमध्ये शिकत आहे. आई-वडिलांच्या कष्टाची त्याला जाणीव आहे. म्हणूनच पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेऊन त्याचे इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल अभियंता होण्याचे स्वप्न आहे.
शिकल्यामुळेच चांगली नोकरी मिळू शकते व त्यासाठी कष्ट करण्याची त्याची तयारी आहे. आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी त्याला शिकायचे आहे. आई-वडिलांनीही मुलाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला पाठबळ दिले आहे.शाळेतील अभ्यासावरच लक्षबेताची परिस्थिती असतानाही श्रीकांत रहाटे याने परिस्थितीशी दोन हात करून यश मिळवले आहे. अन्य विद्यार्थी खासगी शिकवणुकीकडे वळले असताना श्रीकांतने केवळ शाळेतील अभ्यासावरच एवढे गुण मिळवले. आई-वडील आपल्यासाठी करत असलेले कष्ट लहानपणापासून बघितल्याने श्रीकांतने अभ्यासावरच लक्ष केंद्रीत केले.