कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे एस.टी. महामंडळाचे गणित पुरतेच काेलमडून गेले. भारमान कमी असल्याने उत्पन्न तुटपूंजे मिळू लागले. उत्पन्नातून डिझेल खर्चही भागविणे अवघड बनल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गणेशाेत्सवाच्या ताेंडावर शासनाकडून महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. रत्नागिरी विभागासाठी ६ कोटी ४७ लाख रुपये प्राप्त झाले असून, त्यामधून विभागातील ४२०० कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन खात्यावर जमा झाले आहे.
गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील एस.टी. वाहतूक शंभर टक्के सुरू करण्याची सूचना करण्यात आली होती. मुंबईतूनही कोकणात १५८५ जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. रत्नागिरीतून परतीसाठी १११० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. रत्नागिरी विभागातून ३७०० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. वाहतूक सुरू होती. भारमानामुळे एस.टी.चे उत्पन्न तोट्यात असल्याने डिझेल खर्च, सुटे भाग, कर्मचारी वेतनासाठी पैसे नसल्याने रत्नागिरी विभागाने महामंडळाकडे निधीसाठी मागणी केली होती. रत्नागिरीसह अन्य विभागांचाही प्रश्न जटिल बनल्यामुळे महामंडळाने शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. महामंडळाला शासनाकडून पाचशे कोटी प्राप्त झाले असून त्यापैकी १७ कोटी रत्नागिरी विभागाला देण्यात येणार आहेत. पैकी सहा कोटी ४७ लाख रुपये जमा केल्याने विभागातील ४२०० कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. उर्वरित रक्कम येत्या दहा तारखेपर्यंत प्राप्त झाल्यास ऑगस्टचेही वेतन लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे एस.टी कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
---------------------------------
कोरोना काळातही निष्ठेने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, शासनाकडून महामंडळाला निधी प्राप्त होताच एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ऑगस्टचे वेतनही लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी