लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने अनलाॅक जाहीर केले असल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारपासून शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या मार्गावरील एस. टी. सेवा पूर्ववत झाली आहे. दिवसभरात शहरी मार्गावर १२८ फेऱ्या, तर ग्रामीण व लांब पल्ल्याच्या १४०० गाड्या दिवसभरात सोडण्यात आल्या.
कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे एप्रिलमध्ये सुरुवातीला वीकेंड लाॅकडाऊन व नंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी. वाहतुकीला परवानगी देण्यात आली. परंतु, दिवसभरात मोजक्याच बसेस सुरू होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये ६१० बसेसद्वारे ४२०० फेऱ्या सुरू होत्या. त्याद्वारे दररोज दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे दिवसाला ४७ ते ४८ लाख रुपयांचे उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत होते. मात्र, संचारबंदी काळात १०० ते १२५ फेऱ्या सुरू होत्या. जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर फेऱ्यांच्या संख्येत घट होऊन ५० ते ५५ फेऱ्या सुरू होत्या. शासनाने अनलाॅक जाहीर केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागातर्फे टप्प्या-टप्प्याने बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून संबंधित मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
विभागातील नऊ आगारांतून फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण मार्गावरील बसेससह लांब पल्ल्याच्या बोरीवली, सांगली, मुंबई, तुळजापूर, स्वारगेट, लातूर, अर्नाळा, कोल्हापूर, आंबेजोगाई, अक्कलकोट, नृसिंहवाडी, पुणे, कऱ्हाड, भांडुप, मिरज, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, ठाणे, आदी मार्गांवर गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, संगणकीय आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नऊ आगारांतून ग्रामीण भागातील एस.टी. सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी ‘ई’ पासची आवश्यकता नाही. सर्वच प्रवाशांना मास्क सक्तीचा असून, प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के वाहतूक करण्यात येणार आहे. वैद्यकीय तसेच अन्य विविध कारणास्तव मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा प्राप्त झाला आहे.
---------------------------
अनलाॅकमध्ये आंतर जिल्हा वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असून, नऊ आगारांतून महत्त्वाच्या मार्गावर गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. संगणकीय आरक्षण उपलब्ध करून दिले असून, प्रवाशांच्या प्रतिसादानंतर गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
- सुनील भोकरे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.