चिपळूण : काही महिन्यांपूर्वी झालेल्या वाद पुन्हा उफाळून आला आणि रागाच्या भरात धारधार हत्याराने तब्बल ५ जणावर सपासप वार करून त्यांना रक्तबंबाळ केले. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजता शहरातील बहादूरशेख नाका परिसरात घडली. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून युवराज शंकर पवार (३३,रा.खेर्डी दातेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यामध्ये संकेश शंकर उतेकर (वय २५), श्रीराम धोंडू झगडे (२६), सागर राजेंद्र चिंदरकर (२४), प्रकाश भगवानराव मोरे (३९) आणि तन्वीर खेरटकर हे पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.युवराज पवार व फिर्यादी संकेश विश्वास उतेकर यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्यामुळे दोघांच्या मनात राग खदखदत होता. सोमवारी रात्री संकेश उतेकर हा आपल्या मित्राबरोबर बहादूरशेख नाका येथे एका माडी केंद्रावर बसला होता. त्याचवेळी युवराज पवार हा देखील त्याठिकाणी आला. मागील घटनेबद्दल मला तुझ्याशी बोलायचे आहे. जरा ऐकून घे, असे त्याने संकेशला सांगितले, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.तुझ्याकडून मला काहीही ऐकायचे नाही असे म्हणत संकेश तेथून बाहेर पडू लागला. आपले म्हणणे ऐकून घेत नाही याचा भयंकर राग युवराजला आला. त्याने सरळ सरळ वाद घालण्यास सुरुवात केली. जोरदार बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात युवराज ने धारधार हत्याराने सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याने संकेश उतेकर यांच्यासह त्याच्या मित्रावर देखील हल्ला चढवला. त्याचवेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मित्रावर देखील त्याने वार करून रक्तबंबाळ केले. यामध्ये संकेश उतेकर, श्रीराम झगडे, सागर चिंदरकर, प्रकाश मोरे आणि तन्वीर खेरटकर हे पाच जण जखमी झाले.याप्रकरणी संकेश उतेकर याने फिर्याद दिली असून त्यानुसार चिपळूण पोलिसांनी भारतीय कायदा ११८(१) व ३५२ नुसार युवराज पवार याच्यावर गुन्हा दाखल करत तात्काळ ताब्यात घेतले आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.