चिपळूण : काही देशात इबोला या तापाच्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर परिषद दवाखाना विभागाअंतर्गत साथ नियंत्रक जनजागृती पत्रकाचे वाटप करण्यात आले. याचा शुभारंभ नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या हस्ते झाला. गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांची रेल्वे स्थानक,ख बसस्थानक आदी ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. चिपळूण पालिका दवाखान्यातर्फे यंदा जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.यावेळी मुख्याधिकारी प्रकाश पाटील, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती आदिती देशपांडे, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले, प्रशासकीय अधिकारी अनंत हळदे, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश कदम, बांधकाम सभापती बरकत वांगडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल मिर्लेकर, माजी नगरसेवक सीमा चाळके, नगरसेवक शशिकांत मोदी, इनायत मुकादम, रुक्सार अलवी, संतोष पेढांबकर आदींची उपस्थिती होती. इबोला तापाचा आजार दूषित पाण्याच्या संपर्कातून अथवा वटवाघूळ, माकड, डुक्कर यांच्या माध्यमातून होतो. नायजेरिया, दक्षिण आफ्रिक, नॉर्वे या देशातून या रोगाची लागण झाली आहे. चिपळूण शहरात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून नागरिकांनी दक्षता घेण्याच्या दृष्टीने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नगर परिषद दवाखाना विभागातर्फे १० हजार पत्रकांचे वितरण केले जाणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात रिक्षाद्वारे ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले जाणार आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने या दरम्यान मुंबई-पुणे आदी शहरातून कोकणात आपल्या गावाकडे येणाऱ्या गणेशभक्तांची अधिक गर्दी असते. या अनुषंगाने इबोलाबरोबरच डेंग्यू, स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बहादूरशेख नाका व उक्ताड येथे भाविकांची तपासणीही केली जाणार आहे. त्यांना आवश्यक ती औषधेही दिली जाणार आहेत, असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे आढळून आल्यास नगर परिषद दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य सभापती देशपांडे यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दवाखाना विभागातील मंगेश देवळेकर, कविता खंदारे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक डी. डी. कदम आदींसह अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)
चिपळुणात साथ नियंत्रण कार्यक्रमाला प्रारंभ
By admin | Published: August 27, 2014 10:24 PM